प्रसाधनगृहांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
By admin | Published: January 6, 2017 05:53 AM2017-01-06T05:53:48+5:302017-01-06T05:53:48+5:30
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराकडून नागरिकांची जादा पैशांसाठी अडवणूक सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने हागणदारीमुक्त नवी मुंबई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान नागरिकांनी परिसरात प्रसाधनगृहच नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन प्रसाधनगृह उभारणी व जुन्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
जुन्या शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटी केली जात असून पहिल्यांदाच प्रसाधनगृह बाहेरून स्वच्छ व सुंदर दिसू लागली आहेत; पण या प्रसाधनगृहांची देखभाल करण्यासाठी व संबंधित ठेकेदार नियमाप्रमाणे कार्यवाही करतात की नाही, याकडे लक्ष देणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्री होत असल्याचेही यापूर्वी निदर्शनास आले आहे. शौचास जाण्यासाठी नागरिकांकडून ५ रुपये शुल्क आकारले जात आहे. काही ठिकाणी दोन रुपये, तर काही ठिकाणी १ रुपया शुल्क घेतले जात आहे. प्रसाधनगृहांची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवली जात नाही. नागरिकांसाठी तक्रारवही ठेवली जात नाही. सद्यस्थितीमध्ये ठेकेदाराचा व पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नंबर दिले आहेत; पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही.
स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. स्वच्छतागृहांना रंगरंगोटी केली असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; पण यापेक्षा येथील व्यवस्थापनाला शिस्त लावण्यात यावी व शुल्क आकारणीविषयी स्पष्टता असावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी चुकीचे काम करत आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रसाधनगृह उघडले जाते व बंद केले जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिखावेगिरी थांबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
अनेक ठिकाणी शौचालयांच्या बाहेर चांगले पोस्टर्स लावले आहेत; पण प्रत्यक्षात प्रसाधनगृह वापरण्यायोग्य नाही, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)