पदपथाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:43 AM2018-10-06T04:43:35+5:302018-10-06T04:44:05+5:30
जीवाला धोका : वृक्ष कोसळल्याने तुटला पदपथ
नवी मुंबई : सीबीडी येथील खचलेला पदपथ दोन महिन्यांपासून तसाच असल्याने पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या मुख्य चौकालगतच हा प्रकार घडलेला असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालावे लागत आहे. अशातच त्याठिकाणी डागडुजीअभावी उर्वरित रस्तादेखील खचत चालल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
सीबीडी सेक्टर ६ येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही दुर्घटना घडली आहे. रस्त्यालगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील सुमारे ५० वर्षांपूर्वीचे जुने झाड पावसामुळे कोसळले. हे झाड सोसायटीची भिंत तोडून लगतच्या पदपथावर कोसळले. यामध्ये नाल्यावरील पदपथ तुटून नाला उघडा झाला आहे. या दुर्घटनेनंतर त्याठिकाणच्या पदपथाची तत्काळ दुरुस्ती करून नाला बंदिस्त करण्याची गरज होती. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनदेखील प्रशासनाकडून नाला दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. परिणामी, लगतच्या वर्षा अपार्टमेंटमधील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी एखादा पादचारी त्याठिकाणी नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीडी पुलाखालील मुख्य चौकात अनेकदा वाहतूककोंडी होत असते.
यावेळी गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात पुढे जाणाºया एखाद्या दुचाकीस्वाराचा देखील त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे; परंतु दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासन यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करूनदेखील तुटलेले पदपथ वेळीच दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप रहिवासी श्रीकृष्ण गावडे यांनी व्यक्त केला आहे. तर भविष्यात त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असाही आरोप त्यांनी केला आहे.
पदपथ तुटून नाला उघड्यावर आल्याने दूषित पाण्याची दुर्गंधी व त्यामधील डासांचा सोसायटीमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याचाही धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासन गांभीर्य घेत नसल्याच्या कारणांचेही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.