नवी मुंबई : दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या खाली झोपडपट्टी वसली असून, धरण फुटल्यास किंवा पूर आल्यास पूर्ण वसाहत वाहून जाऊ शकते. इंग्रजांनी ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे सुरू केल्यानंतर वाफेच्या इंजिनासाठी आवश्यक पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी दिघा परिसरामध्ये धरण बांधले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धरणाकडे सर्र्वांनीच दुर्लक्ष केले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वी धरणाला भेट देऊन येथील पाणी दिघा परिसरातील रहिवाशांना पुरविले जाणार असल्याची घोषणा केली. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला असल्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याचा दावा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रक काढून त्यांनी दिघा धरणासाठी कसा पाठपुरावा केला, याचा तपशील जाहीर केला. खासदार असताना केंद्र शासनाकडे दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. यामुळेच हा प्रश्न सुटला असल्याचे जाहीर केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्यामुळे वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. १०० वर्षांपूर्वीच्या या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याचे स्ट्रक्चरल आॅडिट अद्याप झालेले नाही. धरणाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आहेत. धरणातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत झोपड्या झाल्या आहेत. भविष्यात धरण फुटले तर पूर्ण वसाहत वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिघा धरणाचा प्रश्न सोडविण्याचा दावा करण्यापूर्वी याविषयीची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. धरणाच्या बांधकामाची व्यवस्थित पाहणी करावी. आवश्यक डागडूजीचे काम करण्यात यावे. धरणाच्या पायथ्याला असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाल्याने येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
By admin | Published: April 09, 2016 2:28 AM