नवी मुंबई : मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने रेल्वे स्टेशनसह सर्व शहरांमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. हल्ल्याला दहा वर्षे झाल्यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे स्टेशनमधील बंकर उद्ध्वस्त झाले आहेत. सुरक्षेसाठी तैनात केलेले काही पोलीस कर्मचारी बंदूक बाजूला ठेवून मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
२६/११ च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शहरातील सर्व प्रमुख चौक, महामार्ग, शासकीय कार्यालये व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शस्त्रधारी जवान तैनात केले होते. साध्या वेशातून पोलीसही तैनात केले आहेत. वास्तविक दहा वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतरच रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बंकर तयार केले होते. परंतु देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नसल्यामुळे बंकरचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. तंबाखू व गुटखा खाणारे प्रवासी बंकरमध्ये थुंकत आहेत. यामुळे आणीबाणीच्या स्थितीमध्ये त्यांचा वापर करणे शक्य होणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर कॅमेरे बसविले आहेत. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी फेरीवाले थेट रेल्वे स्थानकामध्ये व्यवसाय करत आहेत. परंतु कोणावरही कडक कारवाई होत नाही.
शासकीय कार्यालयांमध्ये ये - जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात नाही. कुठेही बेवारस पडलेल्या वस्तूंकडे एक ते दोन तास झाल्यानंतरही कोणीही लक्ष देत नाही. तिकीट खिडकी व इतर ठिकाणी पडलेल्या बेवारस वस्तूंकडेही नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शहरामध्ये बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांकडे बंदुका देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक ठिकाणी हे कर्मचारी बंदुका बाजूला ठेवून मोबाइलवरून गप्पा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.