नवी मुंबई : महानगरपालिकेची सुरुवात दिघापासून सुरू होते; परंतु विकासकामे मात्र सर्वात शेवटी या विभागात पोहोचत आहेत. मार्केट बांधूनही त्याचा वापर केला जात नाही. विभाग कार्यालयाची दुरुस्ती रखडली असून, नागरी आरोग्य केंद्राच्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम करण्यात आले असून, याकडे प्रशासन दुर्लक्ष करू लागले आहे.
महानगरपालिका प्रशासन दिघामधील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. स्थायी समिती सभेमध्येही नगरसेवक नवीन गवते यांनी येथील समस्यांवर आवाज उठवला. येथील विभाग कार्यालयाची इमारत मोडकळीस आली आहे. पालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून ठेकेदाराला तीन महिन्यांपूर्वीच कार्यादेशही दिले आहेत; परंतु विभाग अधिकारी कार्यालय मोकळे करून देत नसल्याने दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नाही. कार्यालयाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विभाग कार्यालयाजवळ महापालिकेने मार्केट बांधले आहे; परंतु अद्याप मार्केटमधील ओटल्यांचे वाटप केलेले नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी गाळेवाटप लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा गवते यांनी व्यक्त केली आहे.महापालिकेने एमआयडीसीकडून रामनगरच्या समोर नागरी आरोग्य केंद्रासाठी भूखंड मिळविला आहे; परंतु भूखंडाला तारेचे कुंपण किंवा संरक्षण भिंत उभारली नसल्यामुळे त्या ठिकाणी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने अद्याप झोपड्यांवर कारवाई केलेली नाही. वेळेत कारवाई करून हा भूखंड मोकळा केला नाही तर नागरी आरोग्य केंद्र उभारण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिघामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. किडेमिश्रीत गढूळ पाणी यापूर्वी स्थायी समिती बैठकीमध्ये दाखविले होते. मोरबे धरण ते दिघापर्यंत जलवाहिनी टाकली असल्याचा व नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे; परंतु प्रत्यक्षात दिघ्यापर्यंत जलवाहिनी पोहोचली नसल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले.