पनवेल - पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीला अनेक सोसायट्या विहिरींचे पाणी वापरतात, तर काही ठिकाणी विहिरींमध्ये कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात. विहिरींचे संवर्धन केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील विहिरी संवर्धनासाठी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील शिल्लक असलेल्या विहिरींचे जतन व्हावे, अशी मागणी शेकापचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी केली आहे.पनवेलमध्ये पूर्वी वाडा संस्कृती होती आणि या वाड्यात विहिरी होत्या. कालांतराने वाड्यांच्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या असून विहिरी बंदिस्त करून तेथील पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळत आहे. काही विहिरी नामशेषसुद्धा झाल्या आहेत तर काही विहिरी मनपाच्या हद्दीत असून त्या दुर्लक्षित असल्याने अस्वच्छ झाल्या आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या विहिरींची डागडुजी करून जलशुद्धीकरण करण्याची गरज आहे. तसेच मैदाने, बगिचे, पालिका कार्यालय आणि शाळेत बोअरवेल मारण्याची मागणी करण्यात आली आहे. लोखंडी पाड्यातील विहीर, दांडेकर वाड्यासमोरील रस्त्यालगतची विहीर अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे शहरातील विहिरी संदर्भात महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी वाढत आहे. बदलते हवामान व वृक्षतोड आणि प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्जन्यमान घटत चालले आहे. सर्वांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरालाही काही वर्षांपासून पाणीटंचाईची झळ बसत आहे. उन्हाळ्यापूर्वीच खासगी टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागतो. पाणीटंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत खेळाचे मैदान, बगिचे, पालिका कार्यालय, आणि शाळेत पाणीपुरवठा करणे मुश्कील होत आहे. याबाबत पालिकेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पालिका क्षेत्रात सुमारे १८२ विहिरी आणि सुमारे १७०० बोअरवेल आहेत. यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पालिका क्षेत्रातील खेळाचे मैदान, बगिचे, विरंगुळा केंद्र, पालिका कार्यालय, आणि शाळेत नव्याने बोअरवेल मारण्यात याव्यात तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विहिरी आहेत.
ऐतिहासिक विहिरी दुर्लक्षित, पनवेलमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 6:36 AM