स्वच्छतेचे प्रतीक महापालिकेकडून दुर्लक्षित, गाडगेबाबा उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:03 AM2018-05-09T07:03:45+5:302018-05-09T07:03:45+5:30
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पुरस्काराच्या पैशातून महापालिकेने नेरूळमध्ये भव्य उद्यान उभारले आहे. शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पुरस्काराच्या पैशातून महापालिकेने नेरूळमध्ये भव्य उद्यान उभारले आहे. शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रवेशद्वारासह सुरक्षारक्षकांची केबिन धोकादायक झाली आहे. पुतळ्याचे हात तुटले आहेत. कारंजासह पाणपोई बंद असून देखभालीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा १५ वर्षांमध्ये चार वेळा गौरव झाला आहे. २००२ - ०३ मध्ये शासनाने प्रथमच संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांक नवी मुंबई महापालिकेने मिळविला. २००५ - 0६ मध्ये महापालिकेने पुन्हा अभियानामध्ये सहभाग घेतला व प्रथम क्रमांक मिळविला. पुरस्काराचे १ कोटी रुपये बक्षीस पालिकेस मिळाले. या पैशातून नेरूळमध्ये आयुक्त निवास इमारतीला लागून असलेल्या ओसाड टेकडीवर संत गाडगेबाबा उद्यान उभारून स्वच्छतेचे कायमस्वरूपी प्रतीक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.२३ मार्च २०१० रोजी उद्यानाचे भूमिपूजन केले व ११ जानेवारी २०११ मध्ये वेळेत उद्यानाचे काम पूर्ण करण्यात आले. सात वर्षांमध्ये तब्बल ६ लाख ८ हजार नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रभावी कामगिरी केली असताना स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या या उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार व तिकीट खिडकीसह सुरक्षारक्षकांची केबिन धोकादायक झाली आहे. जीव मुठीत घेवून सुरक्षारक्षक काम करत आहेत. कोणत्याही क्षणी प्रवेशद्वारासह केबिन कोसळू शकते. उद्यानामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आजोबा व नातू यांचा आकर्षक पुतळा तयार केला आहे. यामधील लहान मुलाचा हात तुटला आहे. उद्यानामध्ये राशींची माहिती देणाऱ्या विभागाचीही दुरवस्था झाली असून अनेक राशींच्या समोरील वृक्ष गायब झाले आहेत.
उद्यानामध्ये धबधबा व विविध ठिकाणी तयार केलेली तळी हे प्रमुख आकर्षण होेते. तळ्यांमध्ये कारंजे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. परंतु पाण्याची कमतरता नसतानाही येथील धबधब्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला असून तळ्यांमधील कारंजे बंद आहेत. राशींची माहिती देणाºया विभागाच्या बाजूला असलेली पाणपोईही बंद झाली आहे. उद्यानामध्ये रोज दोन हजारपेक्षा जास्त नागरिक भेट देत आहेत. या नागरिकांच्या सुविधेसाठी कॅफेटेरीया उभारण्यात आला आहे. पण सात वर्षांमध्ये तो सुरूच केलेला नाही. उद्यानाची दुरवस्था झाली असून त्याची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अॅम्फी थिएटरची माहिती नाही
उद्यानामध्ये अॅम्फी थिएटर उभारले आहे. वाढदिवस व इतर छोट्या कार्यक्रमांसाठी ते भाडेतत्त्वावर दिले जाते. तीन तासांसाठी फक्त साडेसहाशे एवढे नाममात्र शुल्क आकारले जात आहे. परंतु याची जाहिरात करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. अॅम्फी थिएटरजवळही त्याविषयी सूचना फलक देण्यात आलेला नाही.
सुरक्षारक्षकांचा जीव धोक्यात
उद्यानामधील प्र्रवेशद्वार व तिकीट खिडकीची केबिन धोकादायक झाली आहे. कोणत्याही क्षणी ही वास्तू कोसळण्याची शक्यता आहे. धोकादायक झालेल्या केबिनमध्ये सुरक्षारक्षक चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत. पावसाळ्यात केबिन कोसळून सुरक्षारक्षकांना जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा आयुक्त असताना त्यांच्या संकल्पनेतून गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले. उद्यानातील त्रुटी तत्काळ दूर करण्यात याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल.
- समीर बागवान,
परिवहन समिती सदस्य, शिवसेना
प्रौढ नागरिकांसाठी फक्त पाच रुपये व लहान मुलांसाठी २ रुपये प्रवेशशुल्क असल्यामुळे आम्ही नियमित उद्यानामध्ये येतो. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील मुलाच्या पुतळ्याचा तुटलेला हात तत्काळ बसविण्यात यावा.
- सविता शेळके,
नेरूळ सेक्टर १८
सुरक्षारक्षक केबिन व स्वागत कमान कोणत्याही क्षणी कोसळू शकते. पालिका प्रशासनाने तातडीने सुरक्षारक्षकांसाठी कंटेनर केबिन बसवून घ्यावी व स्वागत कमानीसह केबिनची पुनर्बांधणी करावी.
- सुरेश पाटील, सानपाडा
उद्यानातील कॅफेटेरीया सुरू करावा. धबधबा व तळ्यांमधील कारंजेही तत्काळ सुरू करण्यात यावीत. नवी मुंबईतील सर्वात चांगले उद्यान असून त्याची योग्य देखभाल करण्यात यावी.
- कविता साबळे,
नेरूळ सेक्टर १९