नवी मुंबईवासीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष सुरूच, उपचारासाठी मुंबईमध्ये जाण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:26 AM2019-05-09T02:26:23+5:302019-05-09T02:26:42+5:30
महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत. पुरुष विभागात एकही रुग्ण नसून महिला विभागामध्ये फक्त एकच रुग्ण असून शहरवासीयांना उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप येथील कामकाज सुरळीत झालेले नाही. रुग्णालयामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये फक्त २ रुग्ण उपचार घेत आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ६ रुग्ण आहेत. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेडची क्षमता असून येथे एकही रुग्ण नाही. महिला विभागामध्ये २५ बेडची क्षमता असून फक्त एकच रुग्ण असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर नसल्याचे सांगून इतर ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे शहरातील गरीब वस्तीमधील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे.
उपचारासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत असून कर्ज काढून उपचार करावे लागत आहेत. मनपा रुग्णालयाची झालेली स्थिती पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अर्थसंकल्पामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य विभागावरील खर्च वाढत असून नागरिकांना चांगले उपचार मिळत नाहीत. अजून किती वर्षे गैरसोय सहन करायची असा प्रश्नही उपस्थित केला.
जबाबदार कोण?
महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात यापूर्वी रुग्णांसाठी जागाही उपलब्ध होत नव्हती. अनेक वेळा जमिनीवर बेड ठेवून रुग्णांवर उपचार करावे लागत होते. ३५० बेडच्या रुग्णालयामध्ये जेमतेम १५० रुग्णांवरच उपचार करावे लागत आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर, पुरुष व महिला विभागामधील बेड मोकळे आहेत. डॉक्टर नसल्याने रुग्णांना सेवा देता येत नसून या स्थितीला जबाबदार कोण असा प्रश्नही शहरवासी विचारू लागले आहेत.