नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांच्या ठिकाणी सुरक्षेत हलगर्जी होताना दिसून येत आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.सायन-पनवेल मार्गावर प्रतिवर्षी पावसाळ्यात जागोजागी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र, आगामी पावसाळ्यात नागरिकांना सायन-पनवेल मार्गावर खड्ड्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी सार्वजनिक बंधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार मार्गावर अनेक ठिकाणी तसेच काही पुलांवर खोदकाम करून नव्याने काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यावर कोट्यवधी खर्च होत असताना सुरक्षेत हलगर्जी होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. याकरिता दिशादर्शक, रिफ्लेक्टर तसेच बॅरिकेड्स लावणे आवश्यक आहे. मात्र, या उपाययोजनांचा अभाव दिसून येत असल्याने जागोजागी अपघातांना निमंत्रण मिळत आहे.सदर मार्गावरून शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात खासगी वाहनांसह सार्वजनिक व शासकीय वाहनांसह रुग्णवाहिका यांचाही समावेश आहे. त्यांना रात्रीच्या वेळी दुरुस्तीकामाच्या ठिकाणी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश ठिकाणचे रात्री बंदच राहत असल्याने मार्गावर जागोजागी काळोख पसरत आहे. अशा वेळी पुरेशा प्रकाशाअभावी पुढे सुरू असलेले काम दृष्टीस पडत नसल्याने चालकाचा संभ्रम होतो. त्यामुळे ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या परिसरात पुरेसा प्रकाश आवश्यक आहे. खोदकामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स नसल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पलटी होण्याचे प्रकार याआधी मार्गावर घडले आहेत.
महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष; चालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:06 AM