कोविडच्या आडून बेकायदा बांधकामांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:36 AM2021-03-09T01:36:21+5:302021-03-09T01:36:31+5:30
कोपरखैरणेतील प्रकार : स्वच्छ सर्वेक्षणाला हरताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याचा फायदा घेत कोपरखैरणे परिसरातील बैठ्या चाळींतून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात माथाडी वसाहती आहेत. या वसाहतींतील बैठ्या घरांवर वाढीव बांधकाम केले जात आहे. अनेकांनी दोन ते तीन मजल्यांपर्यंत बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे एका मजल्याची परवानगी घेऊन बेकायदेशीररीत्या दोन ते तीन मजल्यांपर्यंत बांधकाम केले जात आहे. बहुतांशी बैठ्या घरांचा ‘ निचे दुकान, उपर मकान’ अशा पद्धतीने वापर सुरू आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. मध्यंतरीच्या काळात अशा बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने कंबर कसली होती.
अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, कोविडमध्ये कारवाई शिथिल झाल्याने अशा प्रकारच्या बांधकामांचा पुन्हा धडाका सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून सेक्टर २ येथे एकाच रांगेत पाच ते सहा घरांचे वाढीव बांधकाम सुरू आहे. त्यासाठी लागणारी खडी, रेती व विटा रस्त्यांवरच टाकल्याने परिसरातील दळवळण प्रभावित झाले आहे. रस्त्यावर खडी व रेती विखुरल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले घसरून पडत आहेत. त्यात अनेक जणांना किरकोळ दुखापती झाल्याचे समोर आले आहे. शहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. देशात प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे.
बेकायदा बांधकामांवर कारवाई करा
कोपरखैरणेत सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे स्वच्छता अभियानाला हरताळ फासला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संबंधित विभागाने अशा बांधकामांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.