भार्इंदर : दिवाळी सुट्टीनिमित्त पालिका सहा दिवस बंद असल्याचा गैरफायदा घेऊन येथील गंगानगरजवळ असलेल्या एमआयडीसीतील आर. के. मेनन नामक केमिकल कंपनीकडून घातक रसायने येथील रहिवास क्षेत्रातील गटारात उघड्यावर सोडली जात आहेत. त्याविरोधात स्थानिकांसह काही समाजसेवकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी करुनही त्याकडे अद्यापही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे उघड्यावर सोडण्यात आलेल्या रसायनांमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच कंपनीने स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका अधिकाय््राांना हाताशी धरुन नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे खोदकाम केले आहे. याविरोधात स्थानिकांत संतापाची लाट उसळली असली तरी त्याची दखल पालिकेकडून घेतली जात नाही. याविरोधात स्थानिक रहिवाशी व भाजपाचे पदाधिकारी गजानन नागे यांनी बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना संपर्क साधून त्यांना सुरु असलेला बेकायदेशीर प्रकार सांगितल्यानंतर आयुक्तांनी प्रभाग अधिकारी दिलिप जगदाळे व अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे प्रमुख दादासोहब खेत्रे यांना घटनास्थळावर पाहणीसाठी पाठविले होते. त्यावेळी काशिमिरा पोलिस ठाण्यातील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांनी त्या कामाला विरोध केल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी हे काम करणारा विनोद जाधव याने पालिका अधिकारी व पोलिसांसमक्ष मी नगरसेवक राजू भोईर यांचा माणूस असल्याचे सांगून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. अखेर याप्रकरणी काशिमिरा पोलिसांत जाधव याच्यावर गुन्हा नोंद केला असून तो भोईर यांचा निकटवर्तीय असून पालिकेत कंत्राटी सफाई सुपरवायझर असल्याचे नागे यांनी तक्रारीत म्हटले आहे. खेत्रे यांनी सांगितले की, कंपनी १५ वर्षे जुनी असून तेव्हापासून तेथील रसायने गटारात सोडली जात आहेत. पालिकेने केलेल्या गटाराच्या कामामुळे पाईपलाईन चोकअप झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे त्याला परवानगीची आवश्यकता नाही. (प्रतिनिधी)
रसायने गटारात सोडण्याकरिता बेकायदेशीर खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2015 11:41 PM