शहरातील बेकायदा गॅरेजमुळे रहदारीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:59 AM2020-12-16T00:59:52+5:302020-12-16T00:59:58+5:30
पालिकेचे दुर्लक्ष; बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघातील स्थिती
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदेशीरपणे गॅरेज थाटण्यात आले आहेत. या गॅरेजमुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अस्वच्छताही झाली आहे.
नवी मुंबई शहर हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते, परंतु वाढलेल्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदा वाहने पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, बेकायदा गॅरेज अशा समस्यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईने राज्यात पहिल्या क्रमांकचे स्थान कायम ठेवले असून, या वर्षी देशात पहिल्या क्रमांकचे स्थान पटकाविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा सर्वच विभागात पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदा गॅरेज मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गॅरेजचालकांनी रस्ते आणि पदपथ काबीज केले असून, यामुळे रहदारीला अडथळा होत असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गॅरेज सुरू असलेले रस्ते आणि पदपथ ऑइलमुळे काळे झाले आहेत, तसेच या परिसरात कचरा होत आहे. शहरात अभियान राबविताना याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पदपथ आणि रस्ते मोकळे व्हावेत, यासाठी पालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
जुनी वाहने विक्रीसाठी
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात, तसेच यामध्ये विक्रीसाठी जुनी वाहने, अपघातग्रस्त वाहनांचाही समावेश असतो. ही वाहने अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी केलेली असतात, यामुळेही दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.