पामबीच मार्गावरील बेकायदा गॅरेजेस्ची धडधड पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:58 PM2020-03-11T23:58:17+5:302020-03-11T23:58:42+5:30
कारवाईला केराची टोपली : वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता
नवी मुंबई : पामबीच मार्गावरील वाशी येथील गॅरेजेस् आणि वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी काही महिन्यांपूर्वी येथील गॅरेजेस् व स्पेअर पार्टच्या दुकानांवर कारवाई केली होती. दुरुस्तीसाठी पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने जप्ती आणली होती. मात्र कारवाईचा ज्वर ओसरताच पुन्हा येथील व्यवहार जैसे थे झाल्याचे दिसून आले आहे.
पामबीच मार्गालगतच्या व्यावसायिक गाळ्यांना मागच्या बाजूने प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी देतानाच तशी तरतूद करण्यात आलेली आहे. पामबीचवरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र येथील सत्र प्लाझा ते एपीएमसीकडे जाणाºया वळणापर्यंतच्या मार्गावरील बहुतांशी दुकानदारांनी पामबीच मार्गाच्या दिशेने प्रवेशद्वारे केली आहेत. यात हॉटेल्स, शोरूम्स तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट्स विक्रेते, गॅरेजेस् आदींचा समावेश आहे. सर्वाधिक प्रमाण गॅरेजेस् व स्पेअर पार्ट विक्रीच्या दुकानांचे आहे. दुरुस्तीसाठी येणाºया वाहनांची येथे रीघ लागलेली असते. वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अनेकदा लहानमोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी येथील गॅरेजेस् व स्पेअर पार्टच्या दुकानांवर गंडांतर आणले होते. नोटिसा बजावून पामबीच मार्गाकडील प्रवेशद्वार बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या परिसरात वाहतूक विभागाच्या समन्वयाने नो पार्किंगचे फलक लावले होते. परिणामी, काही दिवस या मार्गाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून येथील व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. दुरुस्तीसाठी वाहनांच्या रस्त्यावर रांगा लागत आहेत. स्पेअर पार्ट्स विक्रीची दुकाने जोमाने सुरू आहेत. नो पार्किंगच्या फलकांकडे कानाडोळा करीत बेकायदा पार्किंग सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पामबीच मार्गाच्या निर्मितीच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याने यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दोन्ही दिशांना बेकायदा पार्किंग
पामबीच मार्गावर वाहनांच्या पार्किंगला मज्जाव आहे. परंतु या मार्गाच्या वाशीतील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्रास वाहने पार्क केली जातात. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांना केराचा टोपली दाखवत वाहनधारक व येथील व्यावसायिक मनमानी पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या मार्गावरील सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात आहे.