वाहनतळाच्या नियोजनाअभावी बेकायदा पार्किंगचा स्वच्छता अभियानाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 11:25 PM2020-12-27T23:25:06+5:302020-12-27T23:25:12+5:30
शहरवासीयांची डोकेदुखी: वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर वाहतूककोंडी
नवी मुंबई : शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने पार्क करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. याचा फटका सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता अभियानाला बसला आहे, शिवाय वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना या समस्येचा कायमस्वरूपी सामना करावा लागत आहे.
सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोड्समध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोड्समधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजन पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या.
गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही, अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदा वाहनतळ सुरू झाले आहेत. महापालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पुढारी यांच्या संगनमताने अनधिकृत वाहनतळाचा धंदा सध्या तेजीत असल्याचे पाहावयास
मिळते.