नवी मुंबई : ऐरोली स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर खासगी कंपन्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाºया बस रस्त्यालगत उभ्या केल्या जात आहेत, यामुळे अपघाताची शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीत कमालीची वाढ झाली आहे. त्यात जड, अवजड वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. यामुळे जागोजागी वाहतूककोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास ऐरोलीकरांना सहन करावा लागत आहे. या त्रासातून ऐरोलीकरांची अद्याप महिनाभर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यामुळे वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानंतरही ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावरील खासगी कंपन्यांची अवैध पार्किंग हटवण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्या ठिकाणी दोन्ही दिशेच्या मार्गालगत खासगी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. तर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगच्या जागेतही बस उभ्या केल्या जात आहेत. यावरून परिसरातील खासगी कंपन्यांच्या बस पार्किंगसाठी रस्ते व रेल्वेस्थानकाची जागा प्रशासनाने आंदण दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे व कोपरखैरणे परिसरातही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.नोकरी-व्यवसायानिमित्ताने नवी मुंबईत येणाºया कामगार वर्गाची संख्या मोठी आहे, यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळी ठाणे-बेलापूर मार्गावर रहदारी वाढलेली असते. अशा वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या खासगी कंपन्यांच्या बस व कार यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्या ठिकाणी अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खासगी कंपन्यांच्या ताब्यातून ठाणे-बेलापूर मार्गाची सुटका करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु सर्वसामान्यांच्या वाहनांवर तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलीस खासगी कंपन्यांच्या बसवर का कारवाई करत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंगचे पेव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:29 AM