नवी मुंबई : नेरु ळ सेक्टर ३ येथील बस डेपोमध्ये खासगी वाहने बेकायदेशीररीत्या पार्किंग केली जात आहेत, यामुळे बस डेपोचा काही भाग पार्किंगने व्यापला जात असून बस वळविताना चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिवहन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना विचारले जात नाही, त्यामुळे दिवसेंदिवस डेपोमध्ये खासगी वाहनांची संख्या वाढत आहे.
नेरु ळ सेक्टर ३ येथे बेस्ट बसचा डेपो आहे. शहरातील आणि शहराबाहेरील विविध मार्गांवर ये-जा करणाºया बेस्ट आणि एनएमएमटी बसची वर्दळ असते. डेपोशेजारील जनता मार्केटमध्ये झेरॉक्स सेंटर, स्टॅम्प वेंडर, स्टेशनरी दुकाने आदी व्यवसाय सुरू आहेत. तसेच या भागात महावितरणचे कार्यालय, पोस्ट आॅफिस, मार्केट आदी असल्याने या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. व्यावसायिक आणि कामानिमित्त येणारे नागरिक जनता मार्केटच्या बाहेरील रस्त्यावर वाहने पार्किंग करतात.रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने बस डेपोच्या आवारात वाहने उभी केली जात आहेत. या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने डेपोच्या आवारात होणाºया अनधिकृत पार्किंगमुळे वाहनचालकांना डेपोमध्ये बस ने-आण करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.