- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली - पनवेल महापालिका क्षेत्रात महामार्गावर, तसेच शहरातील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग केली जात आहे. त्यामुळे परिसराला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. पुलाखाली वाहने उभी करण्यास सक्त मनाई आहे. याबाबत न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. मात्र याविषयी शासकीय यंत्रणा डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातून शीव-पनवेल महामार्ग, एक्स्प्रेस वे जातो. शीव-पनवेल महामार्गावर कामोठे, पुरुषार्थ पेट्रोल पंप, खारघर हिरानंदानी येथे उड्डाणपूल आहेत. या पुलाखाली सुशोभीकरणाचा प्रस्ताव होता. परंतु तो धूळखात पडला आहे. पुलाखाली गर्दुल्यांचा वावर दिसतो. त्याचबरोबर अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात.कळंबोली येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने ११०० मीटरचा कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधला. पुलाखाली टी अँड टी कंपनी सुशोभीकरण करणार होती. परंतु हा प्रस्तावच रखडला आहे. त्यामुळे सध्या ही जागा मद्यपींचा अड्डा बनली आहे. तिथे दारूच्या बाटल्या, कागद आणि प्लास्टिकच्या ग्लासांचा खच पडलेला असतो. त्याचबरोबर फायर ब्रिगेडसमोर पुलाखाली ट्रक, ट्रेलर, टँकर, रिक्षा, चारचाकी तसेच दुचाकी वाहने उभी केली जातात.गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा पार्किंगचे पेव फुटले आहे. पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोरील पुलाखाली शेकडो दुचाकी वाहने उभी केली जातात. तसेच चारचाकी वाहनेसुद्धा पार्क केलेली असतात.कळंबोली सर्कलजवळ मुंबई-पुणे द्रुुतगती महामार्गाच्या पुलाखाली गेल्या काही वर्षांपासून क्रेन उभ्या केल्या जात आहेत. त्यांचेही पार्किंग अनधिकृत आणि बेकायदा आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.पनवेल शहरात बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखालीही मॅजिक गाड्या यांचा तर बेकायदा पार्किंग स्टँड तयार झाला आहे. खांदा वसाहतीतील पनवेल-दिवा रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाखालील अधिकृत पार्किंग असल्याप्रमाणे कार उभ्या केल्या जातात.अनेक पुलांखाली भंगार सामान टाकण्यात आले आहे, तर काही ठिकाणी गॅरेजचे गोदाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.उड्डाणपुलाखाली ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे वाहने उभी केली जात असतील, त्यांच्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाईल. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिकेचीही मदत घेतली जाईल.- राजेंद्र चव्हाण,सहायक पोलीस आयुक्त,वाहतूक, नवी मुंबईपुलाखाली बेकायदा पार्किंग होत असेल तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि वाहतूक विभागाची आहे. त्यानुसार त्यांच्याकडून त्याबाबत पावले उचलणे अपेक्षित आहे- शंकर सावंत,कार्यकारी अभियंता,रस्ते विकास महामंडळमुंबईत उड्डाणपुलाखाली सुरक्षिततेच्या कारणावरून पार्किंग करू नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मध्यंतरी दिले होते. पनवेल परिसरात बेकायदा पुलाखाली वाहने उभी केली जातात. अशा प्रकारचे वाहन पार्किंग असुरक्षित आहेच. बरोबर नियमांची पायमल्ली करणारे आहे. याबाबत वाहतूक पोलीस, परिवहन विभाग, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आणि सिडकोने ठोस अशी भूमिका घेणे गरजेचे आहे.- अॅड. श्रीनिवास क्षीरसागर,कायदेतज्ज्ञ, कळंबोलीपनवेल महापालिका क्षेत्रातील उड्डाणपूल हे रस्ते विकास महामंडळ यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे, त्यांनी या प्रकरणी कारवाई करणे गरजेचे आहे.- किशोर पाटील,मुख्य अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागप्रतिबंधक उपाययोजनांचा अभावउड्डाणपुलाखाली वाहने उभी राहू नयेत, किंवा तिथे त्यांना प्रवेश करता येऊ नये, यासाठी कामोठेचा अपवाद वगळता या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. तसेच कुंपणही घालण्यात आलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत आहे. यासंदर्भात कोणत्याही यंत्रणांकडून सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. या धोकादायक आणि बेकायदा पार्किंगबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी व्यक्त केले आहे.सोसायटी नाक्याच्या पुलाखाली बांधकामाचे साहित्यपनवेल शहरातील सोसायटी नाका येथे नाका कामगार सकाळी उभे राहतात. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय बेकायदा बांधकामासाठी वापरण्यात येणारे मिक्सर पुलाखाली उभे केले जातात. तसेच रस्त्याच्या कडेलाही अनेक मिक्सर आहेत. त्यांच्यावर कोणत्याच शासकीय यंत्रणेने कधीच कारवाई केल्याचे दिसून येत नाही.उड्डाणपुलाखाली खारघर वाहतूक शाखाखारघर वाहतूक शाखेला अद्याप सिडकोने जागा दिली नाही. त्यामुळे हिरानंदानी येथे उड्डाणपुलाखाली ही वाहतूक शाखा आहे. या ठिकाणी वसाहतीतील वाहने टोचन करून आणली जातात. तेथे शेकडो दुचाकी कायम उभी असतात. उड्डाणपुलाखाली अशा प्रकारच्या पोलीस चौक्या असू नयेत, असा कायदेशीर नियम आहे. परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारे दिव्याखाली अंधार असल्याची स्थिती आहे.
उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंगचे पेव, पनवेल, कळंबोली, खारघर, तुर्भेमधील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 3:04 AM