नवी मुंबई : शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने पार्क करीत आहेत. परिणामी नियोजनबद्ध शहरातील रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात असतानाच आता मुख्य रस्त्यावरही खासगी वाहनांचे पार्किंग सुरू झाले आहे.वाशी-कोपरखैरणे मार्गावर अशाप्रकारे ठिकठिकाणी खासगी बसेस, ट्रक, टेम्पो उभे केल्याचे दिसून येते. या प्रकाराला आताच निर्बंध घातला गेला नाही, तर दळणवळणाची मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवी मुंबई पार्किंगचे नियोजन फसल्याचे याअगोदरच स्पष्ट झाले आहे. वसाहती निर्माण करताना संभाव्य वाहनांचा अंदाज घेतला नाही. त्यामुळे पार्किंगचे नियोजन करण्यात आले नाही. त्याचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. अशाप्रकारच्या वाहन पार्किंगला प्रतिबंध घालण्याचे संबंधित यंत्रणांचे प्रयत्न वेळोवेळी तकलादू ठरले आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या वाहनधारकांनी आता आपला मोर्चा मुख्य रस्त्यांकडे वळविला आहे.टुरिस्ट गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळावाशी-कोपरखैरणे मार्गावर ठिकठिकाणी टुरिस्टसह इतर खासगी वाहनांनी तळ ठोकला आहे. कोपरखैरणे येथील डम्पिंग पॉण्डजवळच्या मार्गावर काही दिवसांपासून ट्रक, टेम्पो आणि स्कूल बसेस उभ्या असतात.होल्डिंग पॉण्ड परिसराचे लाखो रुपये खर्चून सुशोभीकरण केले जात आहे. मात्र अवैध वाहनांमुळे सुशोभीकरण केलेला परिसर दृष्टीआड होत आहे. या वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावर खासगी वाहनांचे अवैध पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:18 AM