सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जलद वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावर बेकायदा वाहने उभी केली जातात. मार्गावर जागोजागी खासगी कंपन्यांची वाहने मोठ्या संख्येने उभी केली जात असल्याने इतर वाहनांच्या रहदारीत अडथळा निर्माण होतो. तसेच अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. तसेच वाहतूक अधिक जलद गतीची व्हावी, याकरिता जागोजागी पूलही उभारण्यात आले आहेत. यामुळे ठाणे व नवी मुंबईमधील प्रवासाचे अंतर पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. परिणामी, मार्गावरील रोजच्या रहदारीतही कमालीची वाढ झाली आहे. परंतु या मार्गावर जागोजागी होणारी अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहने अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.
ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे तसेच इतर अनेक ठिकाणी सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी केली जातात. या मार्गाच्या एका बाजूस औद्योगिक पट्टा असल्याने येथील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बसचा सर्वाधिक समावेश आहे. मुंबई, ठाणे परिसरातून कर्मचाऱ्यांना कंपनीत आणून सोडल्यापासून ते संध्याकाळी कर्मचाºयांना पुन्हा नियोजित ठिकाणी सोडून आल्यानंतर रात्रंदिवस या बस ठाणे-बेलापूर मार्गावरच उभ्या केलेल्या असतात. यामुळे रस्त्याची एक लेन अवैध वाहनांची व्यापली आहे. परिणामी, तुर्भेसह ऐरोली व इतर ठिकाणी रहदारीत अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा दोन लेनमध्येही बस उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडीचा फटका रुग्णवाहिकेलाही बसतो.सर्व्हिस रोडही बळकावलाच्मार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून खासगी कंपन्यांकडून याठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. औद्योगिक पट्ट्यातील बहुतांश कंपन्यांच्या बस ठाणे-बेलापूर मार्गासह सर्व्हिस रोडवर उभ्या असतात. तर काही ठिकाणी पुलाखालची मोकळी जागाही बळकावण्यात आलेली आहे. अवैध पार्किंगवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांसह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.