नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर, खारघर, कामोठे, कळंबोली आदी बसथांब्यांवर खासगी वाहनचालकांकडून अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या बसथांब्यांवर एसटी, बेस्ट, एनएमएमटी, केडीएमटी आदी परिवहन बसेसचे थांबे आहेत. शहरात तसेच राज्यातील विविध भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या बसथांब्यांवरून बस उपलब्ध होतात. या बसथांब्यांवर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बस, टेम्पो, जीप, ट्रँकर यासारखी वाहने बसथांब्यांवर प्रवासी घेण्यासाठी तासनतास उभी केली जात आहेत. दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एपीएमसी मार्केटमधून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागात जाणारे टेम्पो, ट्रॅकर देखील प्रवासी घेण्यासाठी या बसथांब्यांवर उभे असतात. तसेच पुणे, शिवाजीनगर आणि स्वारगेट भागात जाण्यासाठी महामार्गावरील बसस्टॉप परिसरात सकाळपासून खासगी चारचाकी वाहनांचा गराडा असतो.
या वाहनांमुळे एसटी किंवा परिवहन उपक्रमाच्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. बस थांब्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, लहान-मोठे अपघात देखील घडत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत असून, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.