अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई, देशी कट्ट्यासह दोन काडतूस जप्त
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 7, 2022 11:00 PM2022-10-07T23:00:10+5:302022-10-07T23:00:25+5:30
न्हावा गावामध्ये एकजण अवैध पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती.
नवी मुंबई : अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी न्हावा गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या कट्ट्यासह दोन काडतूस जप्त करण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री न्हावा गावात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
न्हावा गावामध्ये एकजण अवैध पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार शिवाजी राऊत आदींचे पथक केले होते. त्यांनी गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास न्हावा गावातील मैदानालगत सापळा रचला होता. यावेळी तिथे संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अंग झडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतूस आढळून आले. विक्रांत जयवंत भोईर (२८) असे त्याचे नाव असून तो न्हावा गावात राहणारा आहे. त्याच्यावर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तर त्याने हे पिस्तूल कोणाकडून खरेदी केले व त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत.