नवी मुंबई - गुन्हे शाखा पोलिसांनी नेरूळमधून एकाला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एक इटली बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये देखील पिस्तूलचे फोटो आढळून आल्याने तो शस्त्रांची विक्री करत असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने शुक्रवारी रात्री नेरुळ गावात ही कारवाई केली आहे. परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाकडून गस्त सुरु असताना तिथल्या सहकार बाजार लगत एकजण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे यांनी उपनिरीक्षक सुशील मोरे, हवालदार प्रकाश मोठी, सुधीर पाटील आदींचे पथक केले होते. त्यांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली. यामध्ये त्याच्याकडे इटली बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी चेतन अंबाजी मढवी (३२) याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशीत पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये देखील पिस्तूलचे फोटो आढळून आले आहेत. यावरून तो बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करत असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहे.