- नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टिकविरोधात मोहीम तीव्र केली आहे. दुकानदारांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. राज्यात गुजरात, दमण व भिवंडीमधून प्लॅस्टिक पिशव्या विक्रीसाठी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवसायामध्ये मोठे रॅकेट असून, मूळ पुरवठादारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
नवी मुंबई महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी मॅफ्को व बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये धाड टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. या वेळी जप्त केलेल्या प्लॅस्टिकवर दमण व भिवंडीमधील कंपनीचा लोगो छापण्यात आल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीही एपीएमसी मार्केट व वाशीतील मॉलमध्ये कारवाई केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनीही नवी मुंबईमध्ये गुजरातवरून प्लॅस्टिक विक्रीसाठी येत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती दिली होती. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी जाहीर केल्यानंतर बहुतांश कारखाने बंद करण्यात आले आहेत.भिवंडी व इतर काही ठिकाणी अद्याप चोरून प्लॅस्टिकचे उत्पादन केले जात आहे; परंतु बहुतांश पुरवठा हा गुजरात व दमणवरूनच येत असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी शासनाने गुटखाबंदी केल्यानंतरही उत्पादकांनी त्यांचे बस्तान शेजारील राज्यात सुरू केले व तेथून नवी मुंबईसह पनवेल व राज्यात विविध ठिकाणी पुरवठा सुरू केला आहे. एपीएमसी मार्केटमध्येही गुजरातवरूनच गुटखा विक्रीसाठी येत असतो. त्याचपद्धतीने आता प्लॅस्टिकचा पुरवठा करण्यासाठीही रॅकेट सक्रिय झाले आहे.
महानगरपालिका प्रशासन विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील साठा जप्त करत आहे. प्रत्येक दुकानदारांना पाच हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम कमी असल्यामुळे व्यापारी बिनधास्तपणे पुन्हा विक्री सुरू करत आहेत. तुर्भे विभाग कार्यालयाने एपीएमसी परिसरामध्ये वारंवार धाडी टाकून अनेक दुकानदारांवर कारवाई केली आहे; परंतु या कारवाईचा काहीही परिणाम इतर विक्रेत्यांवर झालेला नाही. कारवाईनंतर दुसºयाच दिवशी पुन्हा प्लॅस्टिकविक्री केली जात आहे.
शहरात भाजी मंडईपासून ते मॉलपर्यंत सर्वत्रप्लॅस्टिकचा वापर सुरूच आहे. प्लॅस्टिकबंदी यशस्वीपणे राबवायची असल्यास यामधील मुख्य पुरवठादारांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्नएपीएमसीजवळ केलेल्या कारवाईमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर भिवंडीचा पत्ता आढळून आला. पिशवीमधील निळ्या पिशव्यांची पाहणी केली असता, त्यामध्ये दमणचा लोगो आढळून आला आहे.
प्लॅस्टिकमधून फळे, भाजीची आवकबाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये गुजरातसह राजस्थानमधून प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच माल येत असल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापाºयांनी सूचना देऊनही परराज्यातील शेतकरी व पुरवठादार प्लॅस्टिकचाच वापर करत आहेत.
नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली आहे. जप्त केलेल्या प्लॅस्टिकपिशव्यांवर गुजरात, दमण, भिवंडीमधील पत्ते आढळून आले आहेत. यामुळे परराज्यातून माल विक्रीसाठी येत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.- राजेंद्र पाटील, उपप्रादेशिक अधिकारीएमपीसीबी, नवी मुंबई