अवैध रिक्षा वाहतुकीला आरटीओचे अभय

By admin | Published: October 2, 2016 03:04 AM2016-10-02T03:04:05+5:302016-10-02T03:04:05+5:30

शहरात बोगस रिक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आला असून परमीट नसलेल्या हजारो रिक्षांचा बिनधास्तपणे व्यवसायासाठी वापर केला जात आहे. पूर्वी फक्त नवी मुंबई आरटीओमध्ये

Illegal rickshaw traffic to RTO | अवैध रिक्षा वाहतुकीला आरटीओचे अभय

अवैध रिक्षा वाहतुकीला आरटीओचे अभय

Next

- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
शहरात बोगस रिक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आला असून परमीट नसलेल्या हजारो रिक्षांचा बिनधास्तपणे व्यवसायासाठी वापर केला जात आहे. पूर्वी फक्त नवी मुंबई आरटीओमध्ये नोंद असलेल्या रिक्षाच बोगस व्यवसायासाठी वापरल्या जात होत्या. परंतु मागील काही महिन्यांपासून मुंबईमधील परमीट व मीटर नसलेल्या शेकडो भंगार रिक्षा महापालिका क्षेत्रात व्यवसाय करताना दिसत असून आरटीओ व वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
नवी मुंबई बोगस रिक्षांचे आश्रयस्थान होवू लागले आहे. परमीट व मीटर नसलेल्या रिक्षांचा व्यवसायासाठी वापर होवू लागल्यामुळे परमीट असलेल्या अधिकृत रिक्षांपेक्षा बोगस रिक्षांची संख्या जास्त झाली आहे. विनापरमीट रिक्षा चालविणाऱ्यांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचाही समावेश आहे. सारसोळे, नेरूळ स्टेशन, घणसोली,ऐरोली, संपूर्ण ठाणे बेलापूर एमआयडीसी, सीवूड परिसरामध्ये या रिक्षा चालविल्या जात आहेत. राजकीय वरदहस्त व रिक्षा संघटनांच्या आशीर्वादाने हा अवैध व्यवसाय सुरू आहे. तर आरटीओ व पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्याच संघटनांसह नेत्यांचा वापर होत आहे. कोपरखैरणेतील एका रिक्षा संघटनेचा अध्यक्षच बोगस रिक्षा वापरत असल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये आहे. पूर्वी नवी मुंबईमधील परवाना उतरविलेल्या रिक्षा शहरात अवैधपणे चालविल्या जात होत्या. परंतु मागील काही महिन्यांपासून मुंबईमधील भंगार रिक्षाही नवी मुंबईत वापरल्या जात आहेत. अनेकांनी एकपेक्षा जास्त रिक्षा विकत घेतल्या असून त्या प्रतिदिन ३५० ते ५०० रुपये घेवून चालकांना दिल्या जात आहेत.
शहरातील अनेक चालक, संघटनांचे प्रतिनिधी व काही गुंडांनी बोगस रिक्षा खरेदी केलेल्या आहेत. या बोगस रिक्षा लायसन्स, बॅच नसणाऱ्यांना चालविण्यास दिल्या जात आहेत. अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना सर्व नियम लागू होत होतात. रिक्षा चालकांना लायसन्स, बॅच, गणवेश असणे आवश्यक असून प्रत्येक वर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. परंतु बोगस रिक्षा चालविणाऱ्यांसाठी कोणतेच नियम बंधनकारक नाहीत. त्यामुळे अधिकृत रिक्षांचे नंबर बोगस रिक्षांवर वापरून व्यवसाय केला जात आहे. २०११ मध्ये परवाना रद्द झालेल्या १३५१ रिक्षांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी देखील काही रिक्षा अद्यापही रस्त्यावर धावत असल्याची शक्यता आहे. यामुळे बोगस रिक्षांविरोधात आरटीओने मोहीम राबवण्याची गरज आहे. त्यासंबंधी काही रिक्षा संघटनांनी आरटीओकडे पाठपुरावा देखील सुरू ठेवला आहे. त्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याचा संताप अधिकृत रिक्षाचालकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे चार ते पाच प्रवासी घेवून जाताना नाकाबंदीमध्येही रिक्षा चालकांना अडविले जात नसल्याने पोलिसांसह आरटीओचेच त्यांना अभय असल्याची चर्चा आहे.

Web Title: Illegal rickshaw traffic to RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.