माथाडींच्या घरांची बेकायदा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:24 AM2018-06-29T03:24:10+5:302018-06-29T03:24:12+5:30
माथाडी कामगारांच्या नावे घरे मिळवून सिडकोच्या एनओसीशिवाय परस्पर विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात सिडकोच्या अटी व शर्तींचा
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या नावे घरे मिळवून सिडकोच्या एनओसीशिवाय परस्पर विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात सिडकोच्या अटी व शर्तींचा भंग करून शासनाचीही फसवणूक होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या नावे घरे लाटून त्यांची विक्री करण्याचा धंदा होत असल्याचा संशय बळावला आहे.
माथाडी कामगारांसाठी सवलतीच्या दरात भूखंड मिळवून, त्याचा काही भाग खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपावरून अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियन व सभासद यांच्यातच वाद सुरू आहे. अशातच त्याच सोसायटीमधील घरे ताबा मिळण्यापूर्वीच बिगर माथाडींना विकली गेल्याचे समोर आले आहे. निम्म्याहून अधिक सदनिकाधारकांनी चार ते पाच वर्षांपूर्वीच हा व्यवहार केलेला आहे. बांधकाम खर्च व इतर खर्च मिळून सुमारे ७ लाखांना माथाडी कामगारांना ही घरे मिळणार आहेत. त्यापैकी अनेकांनी अद्याप घरांचा ताबा नसतानाही ती बिगर माथाडींना विकली आहेत. विशेष म्हणजे या घरांच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन देखील विना अडथळा होत आहे.
माथाडी कामगारांकरिता शासनाकडून घरे मिळवण्यावरून कामगारांच्या विविध संघटनांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे वाटप होणारी घरे गरजू माथाडींनाच मिळत आहेत का, त्यांचे यापूर्वीचे घर आहे का ? हे तपासण्याची संपूर्ण जबाबदारी सिडकोची आहे. त्याची खातरजमा न करताच केवळ हमीपत्राच्या आधारे संघटना सांगेल त्या व्यक्तीला घरांचे वाटप होत आहे. या प्रकारात मूळ माथाडी कामगार घरांच्या लाभापासून वंचित राहत असून, नेत्यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची स्थावर मालमत्ता वाढत चालली आहे.
त्याकरिता माथाडी कामगारांच्या नावे मिळणारे घर संबंधितांच्या ताब्यात येण्यापूर्वीच त्यांचे व्यवहार ठरवले जात आहेत. दीड वर्षापूर्वी घणसोली परिसरात माथाडी कामगारांच्या सोसायट्या उभारल्या आहेत. सद्यस्थितीला त्यामधील निम्म्याहून अधिक घरांची विक्री झाल्याचे समोर येत आहे, तर उर्वरित घरे भाड्याने देण्यासाठी वापरली जात आहेत. यामुळे माथाडी वसाहतींमध्ये भाडेकरू व पेर्इंग गेस्ट यांचेच अस्तित्व दिसत असल्याने तिथला माथाडी कामगार नेमका राहतोय कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी माथाडींना वाटप झालेल्या घरांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामध्ये माथाडींच्या घरांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.