धक्कादायक! नवी मुंबई एअरपोर्टजवळील उलवे खाडीत अवैध रेती उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 09:28 PM2021-02-20T21:28:48+5:302021-02-20T21:29:07+5:30
नवी मुंबई आंतराष्ट्रीय परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा होत असल्याचे उघड झाले आहे.
वैभव गायकर
नवी मुंबई आंतराष्ट्रीय परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा होत असल्याचे उघड झाले आहे.शनिवारी महसूल विभागाने टाकलेल्या धाडीत भरारी पथकाच्या हाती केवळ 16 ब्रास रेती लागली.मात्र रेती उपसा करणाऱ्याबाबत महसूल विभागाला कसलीच माहिती हाती लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
नवी मुंबई विमानतळ उभे राहत असलेल्या वाघिवली ते जुई कामोठे खाडी यासह चिंचपाडा ,कोपर याठिकाणी महसूल विभागाने धाड टाकली सोबत पोलिसांचा फौजफाटा देखील होता.मात्र रेती उत्खनन करण्यासाठी खाडीत असलेले पाईप ,रेती साठा करण्यासाठी असलेले हौद या व्यतिरिक्त केवळ 16 ब्रास रेती महसूल विभागाच्या हाती लागले.उलवा खाडीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा केली जाते .या अवैध्य धंदयांत काही महसूल विभागातील अधिका-यांचे हात देखील काळे झाले आहेत.अशा परिस्थितीत महसूल विभागाला अशाप्रकारे अवैध्य धंदे करणाऱ्याबत काहीच माहिती मिळत नाही हि आश्चर्याची बाब आहे.काही दिवसापूर्वी देखील पनवेल तालुक्यातील अशाच प्रकारे अनेक वर्षांपासून बेकायदेशीर क्रशर (कोऱ्या ) महसूल विभागाने कारवाई करून बंद पाडले.अनेक वर्षांपासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरूच होता.
उलवे खाडीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सक्शन पंप ,होड्या आदी काहीच महसूल विभागाला सापडले नसल्याने महसूल विभागातील या अवैध्य धंद्याशी लागेबांधे असलेल्या कर्मचाऱ्यांनी रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना माहिती दिल्याने केवळ 16 ब्रास रेतीच महसूल विभागाच्या हाती लागल्याची चर्चा आहे.
तक्रारप्राप्त झाल्यावर संबंधित ठिकाणी धाड टाकुन कारवाई करण्यात आली.घटनास्थळी कोणी सापडले नाही.अशाप्रकारे कारवाई सुरूच राहणार आहे.
-विजय तळेकर (तहसीलदार ,पनवेल )