तळोजा एमआयडीसीत बेकायदा माती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:10 AM2020-01-06T00:10:22+5:302020-01-06T00:10:31+5:30

तळोजा एमआयडीसीत ५० एकरांवर वृक्ष तोडण्यात आल्याची घटना ताजी आहे,

Illegal soil excavation at Taloja MIDC | तळोजा एमआयडीसीत बेकायदा माती उत्खनन

तळोजा एमआयडीसीत बेकायदा माती उत्खनन

Next

कळंबोली : तळोजा एमआयडीसीत ५० एकरांवर वृक्ष तोडण्यात आल्याची घटना ताजी आहे, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याच तोंडरे गावाच्या हद्दीत शासकीय जागेवर माती खोदाई करून चोरी केली जात आहे. ही माती पॉवरहाउसच्या बाजूला सुरू असलेल्या गोदामाच्या भरावासाठी वापरली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री हे काम काही मातीमाफिया करीत आहेत. हे काम त्वरित थांबवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात जल व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यातच मागील महिन्यात कंपनी उभारण्याकरिता ५० एकर जागेवरील झाडे तोडण्यात आली होती. आता तोंडरे गावच्या हद्दीत तळोजा एमआयडीसी परिसरात टेक्नो वा कंपनीपासून आयपीएलला जाणारा जो प्रस्तावित रस्ता आहे. तिथे म्हणजेच पॉवरहाउसच्या बाजूला १३२ गट क्रमांकाच्या पोट हिश्श्यामध्ये गोदाम बांधण्यात येत आहे. याकरिता भराव करण्याचे काम सुरू आहे.
भरावासाठी लागणारी माती जवळच असलेल्या जमिनीतून आणली जात आहे. ही जागा शासकीय असल्याचे समजते. त्यामुळे मातीमाफिया गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून रात्री २ वाजल्यानंतर या जागेवर खोदकाम करतात. जेसीपी आणि पोकलेनच्या साहाय्याने जमीन खोदली जात आहे. कोणालाच काही समजू नये म्हणून रात्रीची वेळ माती चोरी करण्यासाठी ठरवून घेण्यात आली आहे. खोदकाम करण्यात आलेल्या जमिनीवर मोठमोठे खंदक पडले असून एक हजारांहून अधिक ट्रक माती उचलण्यात आले आहे.
माती खोदण्यासाठी जागा मालक, तसेच शासकीय असेल तर संबंधित विभागाची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यानंतर जितकी माती खोदण्यात येईल, तिची महसूल विभागाकडे रॉयल्टी भरणे आवश्यक आहे. मात्र, तळोजा एमआयडीसी तोंडरे गावाच्या हद्द परिसरात अशा प्रकारे कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच तहसील कार्यालयात रॉयल्टी भरण्यात आलेली नाही. अशाप्रकारे जमीन खोदून माती काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार अमित सानप यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Illegal soil excavation at Taloja MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.