बेकायदा व्यवसायाचा होतोय अधिकृत व्यापाऱ्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 01:28 AM2020-12-13T01:28:02+5:302020-12-13T01:28:07+5:30
एपीएमसीतील प्रकार: पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील अवैध व्यवसायाचा फटका येथील अधिकृत व्यापाऱ्यांना बसला आहे. अधिकृत गाळ्यांच्या समोरच अनधिकृत व्यापार सुरू असल्याने हे व्यापारी संतप्त झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे केली आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकाकडून माथाडी भवनपर्यंतच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार सुरू आहे. विशेषत: एपीएमसी वाहतूक शाखा ते माथाडी भवन दरम्यानचा रस्ता आणि पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापला आहे. काही ठिकाणी तर चक्क रस्तेच अडविले आहेत. मागील अनेक दिवसांपासून फळ मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर टॅम्पोतून कांदा-बटाट्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू आहे. माथाडी भवनपर्यंतच्या अंतरावर टप्प्याटप्प्यावर अनधिकृत व्यवसाय करणारे असे टेम्पो उभे असल्याचे दिसून येते. त्यांच्या जोडीला फेरीवाल्यांची फौज असून, या परिसरातील दळवळण यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे, तसेच कोरोनाचे संकट अद्यापी कायम आहे, परंतु या भागात कोरोनाविषय नियमांना सपशेल हरताळ फासला जात आहे. शारीरिक अंतर राखणे तर दूरच, मास्कचा वापरही केला जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रार करूनही या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही. महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांचा अनधिकृत व्यवसाय फोफावत चालल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
गुरुवारी माथाडी भवनमधील काही गाळेधारकांनी आपले व्यवसाय बंद करून महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर धडक दिली. माथाडी भवनसमोरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, परंतु तीन दिवस उलटले, तरी या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.
महापालिकेच्या माध्यमातून येथील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होणे गरजेचे आहे, परंतु तक्रार करूनही कारवाईला बगल दिली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.
- चंद्रकांत पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस, माजी नगरसेवक