एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अवैध व्यापार; शासनासह प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष
By नामदेव मोरे | Published: January 21, 2023 05:05 AM2023-01-21T05:05:49+5:302023-01-21T05:07:34+5:30
अफगाणिस्तानमधील नागरिकही येथे व्यवसाय करत असून तक्रारी करूनही शासन व प्रशासन काहिही कारवाई करत नाही.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील कोल्ड स्टोरेजमध्ये फळांचा अनधिकृत व्यापार सुरू आहे. अफगाणिस्तानमधील नागरिकही येथे व्यवसाय करत असून तक्रारी करूनही शासन व प्रशासन काहिही कारवाई करत नाही.
बाजार समिती परिसरात मॅफ्को मार्केटला लागून विविध कंपन्यांची कोल्ड स्टोरेज आहेत. शेती व इतर मालांचा साठा करण्याची परवानगी या कंपन्यांना देण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत अनेक कोल्ड स्टोरेज चालकांनी त्यांची जागा अनधिकृत फळ व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर देण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमधील व इतर व्यापारी अनधिकृतपणे फळांचा व्यापार करू लागले आहेत. सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत हा व्यापार सुरू असतो.
युपी कोल्ड स्टोरेज, प्रभू हिरा, जीएचके कोल्ड स्टोरेज मध्ये हा व्यापार सुरू आहे. अवैध व्यापार करणारांनी आता कोल्ड स्टोरेज बाहेरील पदपथ ही व्यापले आहेत. या व्यापाराचा परिणाम बाजार समितीमधील व्यापारावर होऊ लागला आहे.
फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे व इतर सर्व व्यापा-यांनी अवैध व्यापार थांबविण्याची व विनापरवाना व्यापार करणा-यांसह कोल्ड स्टोरेज चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.