बेकायदा पार्किंगच्या आडून अवैध धंदे, गुन्हेगारांना मिळतोय आडोसा; रहिवाशी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:15 AM2020-12-02T00:15:20+5:302020-12-02T00:15:50+5:30
कोपरखैरणेत करण्यात आलेली बेकायदा पार्किंग
नवी मुंबई : रस्त्यांवर बेकायदा पार्किंगला मिळणारी मुभा गुन्हेगारी कृत्यांना कारणीभूत ठरत आहे. यानंतरही अनेक ठिकाणी रहिवाशी भागातील रस्त्यांवर जड अवजड वाहने उभी करून रहदारीला अडथळा, तसेच गुन्हेगारांना आडोसा तयार केला जात आहे. अशाच प्रकारातून कोपरखैरणेतील रहिवासी त्रस्त आहेत.
शहरातील रस्ते बेकायदा पार्किंगला आंदण दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. रहिवाशी भागात, तसेच रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर अवैध पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निमार्ण केला जात आहे. कोपरखैरणे सेक्टर १३ येथील मार्गावर असाच प्रकार पाहायला मिळत आहे. वाशी कोपरखैरणे मार्गाला जोडलेल्या या रस्त्याची एक लेन वाहनतळ म्हणून वापरला जात आहे. यामुळे एक टाकीपासून ते कॉर्पोरेट बँकपर्यंतचा रास्ता बेकायदा पार्किंगच्या घशात गेला आहे. दिवस-रात्र त्या ठिकाणी जड अवजड वाहने उभी केलेली असता, त्याच्या आडून रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अवैध धंदे चालत आहेत. यामुळे परिसरातले व परिसराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे त्या ठिकाणी अड्डे बनू लागले आहेत. याचा नाहक त्रास त्याठिकाणावरून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे,
तर महिलांना रात्रीच्या वेळी तिथून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे तिथे अवैधरीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ती हटवण्याची मागणी रहिवाश्यांकडून होत आहे, परंतु तक्रार करून वाहतूक पोलीस व पालिका प्रशासन कारवाईकडे कानाडोळा करत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.