उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:55 AM2019-05-16T00:55:31+5:302019-05-16T00:55:52+5:30

शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत.

 Illegal traffic influx due to summer holidays; Neglect of RTO, traffic police | उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Next

नवी मुंबई : शाळांना सुट्ट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
नवी मुंबई शहरात राज्यातील विविध भागातील नागरिक वास्तव्य करीत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून लग्नसराई देखील सुरु आहे. त्यानिमित्ताने गावी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. एसटी बसचे आरक्षण देखील फुल्ल असल्याने नागरिकांना महामार्गावरील बस थांब्यांवर जाऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर आणि सायन- पनवेल महामार्गावर एसटी बसचे थांबे आहेत. सायन- पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरु ळ, बेलापूर, खारघर, कळंबोली, खांदा वसाहत आणि पनवेल आदी बस स्टॉपवर प्रवासी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. खाजगी वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत असून प्रवासी घेण्यासाठी बसस्टॉपवर गर्दी करीत आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. भाजीपाला, दूध आदी मालवाहतूक करणारे ट्रक, टेंपो चालक देखील या गर्दीचा फायदा घेऊन पुणे, चाकण, राजगुरूनगर, नारायणगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आदी भागातील प्रवासी घेण्यासाठी बस स्टॉपवर थांबत आहेत.
टेंपोसारख्या वाहनांमध्ये चालकाच्या केबिनमध्ये तसेच मागील बाजूस प्रवासी बसवून त्यांची वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांकडून एसटीच्या प्रवास भाड्यापेक्षा अधिक भाडे वसूल करीत आहेत. ट्रॅव्हल्स बस, कार, जीपसारखे वाहनचालक देखील या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असून मनमानी पद्धतीने पैसे आकारत आहेत. प्रवासी घेण्यासाठी अवैध वाहतूक करणारी लहान-मोठी सर्व वाहने बस स्टॉपवर उभी केली जात असल्याने इतर वाहनांना तसेच एसटी बसला अडथळा निर्माण होत असून वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title:  Illegal traffic influx due to summer holidays; Neglect of RTO, traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.