प्रतिमा - नवी मुंबई छायाचित्रण स्पर्धा
By admin | Published: November 13, 2016 01:39 AM2016-11-13T01:39:21+5:302016-11-13T01:39:21+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रण कलेला दाद देण्यासाठी तसेच त्यांनी टिपलेले शहरातील प्रकल्प, सौंदर्यस्थ
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या छायाचित्रण कलेला दाद देण्यासाठी तसेच त्यांनी टिपलेले शहरातील प्रकल्प, सौंदर्यस्थळे, सण-उत्सव, संस्कृती, पर्यावरण आदी छायाचित्रांचे दर्शन घडविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रतिमा-नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा २०१६-१७ आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेमध्ये दिघा ते सी.बी.डी. बेलापूर या महापालिका क्षेत्रातील रहिवासी असणारे व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार सहभागी होऊ शकतात. व्यावसायिक छायाचित्रकारांच्या गटाकरिता रु २० हजार रकमेची ८ पारितोषिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या गटाकरिता १० हजार रुपये रकमेची ४ पारितोषिके स्मृतीचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, क्रीडा व सांस्कृतिक विभाग सेक्टर ३, सी.बी.डी. बेलापूर या ठिकाणी तसेच महानगरपालिकेची वेबसाईट येथे उपलब्ध आहेत. २८ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. योग्य आकारातील छायाचित्रांसह मोठ्या आकाराच्या लिफाफ्यात महापालिका आयुक्तांच्या नावे लिफाफ्याच्या डाव्या कोपऱ्यात वरील बाजूस प्रतिमा -नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धा याकरिता असे नमूद करून दाखल करावयाचे आहेत. (प्रतिनिधी)
स्पर्धेचे नियम व अटी
स्पर्धेकरिता छायाचित्रकार आपल्या कॅमेराने टिपलेली, सौंदर्य व मूल्यांची जपणूक करणारी सर्वोत्तम पाच छायाचित्रे स्पर्धेकरिता पाठवू शकतात. मात्र, त्यामध्ये किमान दोन छायाचित्रे ही नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पांची असायला हवीत. छायाचित्रकाराने अर्जासोबत आठ बाय बारा आकारातील प्रत्येक रंगीत छायाचित्राची एक मॅट फोटो प्रिंट आणि हाय रिझॉलेशन फोटोची सीडी देणे आवश्यक आहे.