नवी मुंबई : मागील पाच दशकांत सिडकोने विविध नोडमध्ये बांधलेल्या प्रकल्पांतील शिल्लक असलेली घरे आणि व्यावसायिक गाळ्यांची लवकरच विक्री करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या रेडिरेकनर दराप्रमाणे या मालमत्तांच्या किमती निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सिडकोने मागील ५० वर्षांत जवळपास एक लाख ३५ हजार घरे बांधली आहेत. यात व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश आहे. १४ नोडमध्ये उभारण्यात आलेल्या बांधकाम प्रकल्पातील अनेक घरे आणि व्यावसायिक गाळे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. वर्षोनुवर्षे विक्रीअभावी पडून असलेल्या अनेक घरांवर दलालांनी कब्जा केला आहे, तर सिडकोच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक मालमत्तांची परस्पर विक्री करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. त्यानुसार सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी विविध नोडमध्ये विक्रीविना पडून असलेल्या मालमत्तांचा खासगी संस्थेकडून सर्व्हे करून घेतला होता. यात अडीच ते तीन हजार मालमत्ता विक्रीविना पडून असल्याचे स्पष्ट झाले होते. यात घरे आणि दुकानांचा समावेश आहे. सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही घरे आणि दुकाने विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिल्लक असलेल्या या सर्व मालमत्ता राज्य सरकारच्या रेडिरेकनरच्या दरात विकण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हा दर विद्यमान बाजारभावानुसार ठरत असल्याने सिडकोच्या तिजोरीत चांगला महसूल मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सिडकोने वाशी, सानपाडा, ऐरोली, बेलापूर, या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुले उभारली आहेत; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांशी रेल्वेस्थानक संकुलात आजही अनेक मालमत्ता विक्रीविना पडून आहेत. या सर्व मालमत्तांची रेडिरेकनरच्या दराने विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानक संकुलातील रिक्त व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी गेल्या महिन्यात ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीचा शुभारंभ करण्यात आला होता. बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण करून सर्वाधिक बोलीधारकास यशस्वी अर्जदार म्हणून घोषित करण्यात आले.