नवी मुंबईत नियम पाळून विसर्जन; १५८ ठिकाणी २,००० हून अधिक बाप्पांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:47 AM2020-08-24T01:47:28+5:302020-08-24T01:47:44+5:30
शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली.
नवी मुंबई : कोरोना संकटामुळे या वर्षी शहरातील अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपती दीड दिवसांचे बसविण्यात आले होते. विसर्जन स्थळी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. नियमांचे पालन करून नागरिकांनी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.
रविवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या विभागांतील एकूण १५८ ठिकाणी २००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. शासन आणि महापालिकेने लागू केलेल्या नियमावलीचे पालन करीत, भाविकांनी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरातील प्रत्येक विभागात तलावांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विसर्जन स्थळी भाविकांची गर्दी नव्हती.
मिरवणुका नाही : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक न काढण्याच्या सूचना शासन, महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक आणि घरगुती गणोशात्सव साजरा करणाऱ्या भक्तांनी या सूचनांचे पालन करीत कोणतीही मिरवणूक काढली नाही. गणरायाच्या विसर्जनावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गर्जनेसह निरोप देण्यात आला.