पूल दुरुस्तीच्या कामाचा वाहतुकीवर परिणाम, शिरवणेत धिम्या कामामुळे वाहतूककोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:36 AM2019-02-07T03:36:38+5:302019-02-07T03:37:00+5:30
शिरवणे येथील पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
नवी मुंबई - शिरवणे येथील पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सायन-पनवेल मार्गावरील शिरवणे येथील पुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला असून, त्या ठिकाणी अपघातांची मालिका घडून अनेकांना प्राण गमवावे लागले होते. गतवर्षाच्या अखेरीस शासनाने ब्लॅक स्पॉट घोषित करून त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे. तर पुलाचे दुरुस्तीकाम सुरू असेपर्यंत त्या ठिकाणची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी विविध सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत. पोलिसांच्या सूचनांचेही गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाला नसल्याने वाहतूककोंडीचा तिढा सुटला नाही, त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामनाही करावा लागतो आहे.