नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या नऊ जणांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री परिसरात ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यात ते नशा करताना आढळले. यावरून शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
कोपरखैरणे सेक्टर २२ व २३ मध्ये रात्रीच्या वेळी तरुण घोळक्याने जमून नशा करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार गुरुवारी रात्री वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सम्राट वाघ यांच्या पथकाने कोपरखैरणे परिसरात मैदान व मोकळा भूखंड अशा दोन ठिकाणी छापे टाकले. दोन्ही ठिकाणी तरुणांच्या टोळ्या अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्या. तंबाखू तसेच सिगारेटमध्ये गांजा मिसळून त्यांच्याकडून नशा केली जात होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, काहीही आढळले नाही. मात्र त्यांनी गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली. वैद्यकीय चाचणीतही त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. यानुसार त्यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक रोहिदास झिरे (३१), आयुब आमिर खान (२४), अक्षय सुरेश पुजल (२८), अखिलेश महेश मिश्रा (२५), आकाश भगवान बढे (२५), रोशन बबन कंक (२२), प्रथमेश प्रकाश लाड (२२), विशाल अंकुश माने (२३) व अमोल विलास वावलकर (२५) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण कोपरखैरणे व बोनकोडे परिसरात राहणारे आहेत. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी ते अमली पदार्थाचे सेवन करायचे. त्यामुळे परिसरात फेरफटका मारण्यासाठी येणाºया ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र या प्रकारावरून शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाया केल्या आहेत. त्यानंतरही गांजाची विक्री थांबतच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.च्तरुणांचे टोळके अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.