आईच्या शस्त्रक्रियेसाठी ठेवलेल्या पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:37 AM2018-06-19T02:37:09+5:302018-06-19T02:37:09+5:30

आईची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरक्षारक्षकाने साठवलेल्या दीड लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

Imprisonment of money kept for mother's surgery | आईच्या शस्त्रक्रियेसाठी ठेवलेल्या पैशांचा अपहार

आईच्या शस्त्रक्रियेसाठी ठेवलेल्या पैशांचा अपहार

Next

नवी मुंबई : आईची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरक्षारक्षकाने साठवलेल्या दीड लाख रुपयांचा अपहार झाला आहे. एटीएममधून परस्पर पैसे हडप करण्यात आले आहेत. पैसे परत मिळावे यासाठी तीन महिने बँक व्यवस्थापनासह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारत आहे. बँक व्यवस्थापन फक्त आश्वासने देत असल्यामुळे कंटाळलेल्या सुरक्षारक्षकाने उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विकास भिलारे या तरुणाचे मार्केटमधीलच युनियन बँकेमध्ये खाते आहे. आईची प्रकृती ठीक नसून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने भिलारे याने दीड लाख रुपयांची बचत केली होती. १२ मार्चला अचानक त्यांच्या बँक खात्यामधून दहा हजार रुपये काढण्यात आले. थोड्या वेळाने पुन्हा दहा व पाच असे एकूण २५ हजार रुपये काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी दोन वेळा दहा हजार, एक वेळा ५ हजार व एक वेळा ४ हजार असे एकूण ५४ हजार रुपये काढले. तिसºया दिवशी ४६ हजार ८९९ रुपये काढण्यात आले. तिसºया दिवशीही बँकेतून २५ हजार रुपये रोख रक्कम काढण्यात आली व बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रुपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रुपये काढण्यात आले आहेत.
बँकेतून पैसे काढल्याचे कळताच भिलारे व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेने पुन्हा सायबर सेलमध्ये जाण्यास सांगितले. सायबर सेलने बँकेत पाठविले. बँकेत लेखी पत्र दिले. तीन महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही.
बँकेने तीन महिन्यानंतर तुमच्या एटीएम कार्डचा वापर करूनच पैसे काढल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु भिलारे यांनी माझ्या एटीएमचा वापर झालेला नाही. वाटल्यास सीसीटीव्हीचे फुटेज पहावे असेही सुचविले. परंतु वेळकाढूपणा केला जात आहे. न्याय मिळत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी युनियन बँकेच्या एपीएमसीमधील शाखेत फोन केला, परंतु व्यवस्थापकांशी संपर्क होवू शकला नाही.
>आईच्या शस्त्रक्रियेसाठी जमविलेले पैसे एटीएममधून परस्पर काढण्यात आले असून बंगळुरूमध्ये खरेदी केली आहे. पैसे नसल्याने आईची शस्त्रक्रिया रखडली आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही युनियन बँक व्यवस्थापन दाद देत नसून आता दखल घेतली नाही तर बँकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहे.
- विकास भिलारे,
पीडित सुरक्षारक्षक

Web Title: Imprisonment of money kept for mother's surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.