उल्हासनगरात सुधारगृहातील तरूणी गरोदर
By admin | Published: July 15, 2015 11:33 PM2015-07-15T23:33:23+5:302015-07-15T23:33:23+5:30
शहरातील शासकीय शांतीसदन महिला वस्तीगृहातील २१ वर्षाची तरूणी गरोदर राहिली असून विभागीय आयुक्त पोखरकर यांनी अश्लिल शब्दाचा वापर केल्याची तक्रार
उल्हासनगर : शहरातील शासकीय शांतीसदन महिला वस्तीगृहातील २१ वर्षाची तरूणी गरोदर राहिली असून विभागीय आयुक्त पोखरकर यांनी अश्लिल शब्दाचा वापर केल्याची तक्रार येथील महिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिडित तरूणीला ठाणे येथील सामाजिक संस्थेकडे हलविले असून अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
उल्हासनगर कॅम्प नं-५, येथे हे वस्तीगृह असून तेथे अनैतिक धंद्यात पकडलेल्या मुली व महिलांना ठेवण्यात येते. भिंवडीत पकडलेल्या ब्रह्मदेश येथील २१ वर्षाच्या तरूणीला १९ जुलै २०१४ साली न्यायालयाच्या आदेशान्वये वस्तीगृहात ठेवण्यात आले होते. तसेच मायदेशी परत पाठविण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
सावत्र मेहुण्याने चांगल्या कामाचे आमिष दाखवून या तरुणीला मुंबईला आणून भिंवडी येथील आशा नावाच्या महिलेला विकले होते. त्यावेळी तिची ओळख अब्दुला नावाच्या तरूणासोबत होऊन नंतर त्यांनी लग्न केले.
भिवंडी पोलिसांनी या तरूणीला एका प्रकरणात ताब्यात घेतल्यावर ती ब्रह्मदेशची रहिवासी असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने उल्हासनगर येथील महिला सुधारगृहात ठेवण्याचे व मायदेशी पाठविण्याचे आदेश दिले.
ही तरूणी गरोदर असल्याची माहिती विभागीय आयुक्त बी.टी.पोखरकर, जिल्हा बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण, व जाधव यांना मिळाल्यावर त्यांनी रविवारी वस्तीगृहातील मुलीची चौकशी केली. पोखरकर यांनी एकेका मुलीची चौकशी करून अश्लिल भाषेचा वापर केल्याच्या तक्रारी काही महिलांनी अधिक्षिका नंदा घोडेराव यांच्याकडे केल्या आहेत. हे आरोप पोखरकर यांनी फेटाळले आहे.
पिडीत तरूणीचे प्रियकराशी वस्तीगृहात अथवा बाहेर संबध आल्याने ती गरोदर राहिल्याची चर्चा आहे. तिने याची कबूली दिल्याची माहिती अधिक्षका घोडेवार यांनी दिली. विभागीय आयुक्तांनी हा अहवाल विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविला असून अश्लील भाषेचा वापर केला नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे. (प्रतिनिधी)