नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीदरामध्ये सुधारणा केली जाणार आहे. फ्लॅटरेटधारकांप्रमाणे गावठाण, झोपडपट्टी व सर्व प्रकारच्या मीटरधारकांना ५० रुपयांमध्ये ३0 हजार लिटर पाणी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे पाणीपुरवठ्यासाठीचा खर्च व उत्पन्न यामध्ये मोठी तफावत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने फेब्रुवारी २०१० मध्ये वैयक्तिक मीटर असलेल्या ग्राहकांना ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु प्रत्यक्षात वैयक्तिक मीटरधारकांची संख्या कमी असल्यामुळे या योजनेचा लाभ बहुसंख्य नागरिकांना झालाच नाही. गृहनिर्माण सोसायटी, गावठाण व झोपडपट्टीमधील नागरिकांना याचा काहीही उपयोग झाला नाही. हा ठराव मंजूर करताना व त्यानंतरही गृहनिर्माण सोसायटीसाठीही ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्यात यावे अशाप्रकारे उपसूचना मांडल्या होत्या. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पाणी दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पूर्वीच्या फ्लॅटरेटधारकांप्रमाणे सर्व मीटरधारकांना ५० रुपयांमध्ये पाणी द्यावे. शाळा, कॉलेज, धर्मादाय नोंदणीकृत संस्था, शिक्षण मंडळे यांना प्रस्तावित ११ रुपयेऐवजी ४.७५ प्रमाणे दर आकारण्यात यावा. विनाजलमापक ग्राहकांना १८३० रुपये महिनाऐवजी १ हजार रुपये दर प्रस्तावित केले आहेत. बांधकाम प्रमाणपत्र असलेल्या व भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या मात्र रहिवासी वापर सुरू असलेल्या इमारतधारकांनी एक वर्षापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र सादर न केल्यास एक वर्षानंतर प्रस्तावित १५ रुपयेऐवजी ७.५० रुपयेप्रमाणे दर आकारणी करण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे.महापालिकेने ५ मार्चला आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. वास्तविक २०१० मध्ये स्वस्त दरात पाणी देण्याचा ठराव मंजूर केला होता. तेव्हापासून या योजनेचा वर्षनिहाय नक्की किती नागरिकांना लाभ झाला याचा आढावा घेण्यात आला नाही. तेव्हा मांडलेल्या उपसूचनांची अंमलबजावणी का झाली नाही याचीही विचारणा केलेली नाही. निवडणुका जवळ आल्या असताना शहरवासीयांना खूश करण्यासाठी स्वस्त पाणी योजनेचे प्रलोभन दाखविले जात असल्याची चर्चा आहे.>उत्पन्नावर होत आहे परिणामजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थापन प्रकल्पाच्या अहवालातील अनिवार्य सुधारणानुसार व शासन निर्णयाप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचा खर्च पाणीबिलामधून मिळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीवर १०८ कोटी २३ लाख रुपये खर्च होत असून पाणी देयकातून फक्त ८० कोटी ७० लाख रुपये जमा होत आहेत. सद्यस्थितीमध्ये २७ कोटी ५३ लाख रुपये तूट असून सुधारित प्रस्तावामुळे ही तूट अजून वाढत जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीदरामध्ये सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:15 PM