नवी मुंबई : हसत खेळत राहिल्याने तणाव कमी होतो. या कार्यक्रमात आल्यानंतर तर मी खऱ्या अर्थाने तणावमुक्त झालो आहे, असे प्रतिपादान राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. गृहमंत्रिपदाचा भार हलका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. तणावमुक्त राहण्यासाठी माणसाने नेहमी हसत राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राच्या वतीने नेरूळ येथे पुण्यातील योग तज्ज्ञ अशोक देशमुख यांच्या हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वळसे पाटील, त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी यावेळी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या हसत खेळत तणावमुक्ती या विषयावरील दोन तासांच्या व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
हा कार्यक्रम पाहून मी सतत हसत होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज तणावमुक्त झाल्याचे दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. त्यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवी मुंबई मराठी साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, बृहन्मुंबई नागरी सह बँक असोसिएशन अध्यक्ष काशिनाथ मोरे, ऐरोली ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष बबन पाटणकर यांना प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. अशोक पाटील यांनी आभार व्यक्त केले.