ऐरोलीमध्ये २० नागरिकांनी बजावला गृहमतदानाचा हक्क, निवडणूक विभागाचे मानले आभार
By नामदेव मोरे | Published: May 12, 2024 06:48 PM2024-05-12T18:48:32+5:302024-05-12T18:48:45+5:30
मतदान करताआल्याने व्यक्त केले समाधान
नवी मुंबई : ठाणे मतदारसंघातील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये रविवारी गृहमतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना घरातूनच मतदान करता आल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले व निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूचिता भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी पथके तयार केली होती. ८५ वर्षांवरील दिव्यांग नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन मतदानाची संधी देण्यात आली आहे. मतदान गुप्त राहील याचीही काळजी घेण्यात आली.
पहाटेपासून निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या घरी जाऊन त्यांची मतपत्रिका सीलबंद बॉक्समध्ये घेण्यात आली. २२ मतदारांची नोंदणी झाली होती. यापैकी एक मतदाराचे आठवड्यापूर्वी निधन झाले. एक मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नाही. उर्वरित २० जणांनी मतदान केले आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
गृहमतदानासाठी मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊपासून मतदान प्रक्रिया सुरू केली व दिवसभरात वेळेत ती पूर्ण करण्यात आल्याची माहिती सूचिता भिकाणे यांनी दिली.