पाच वर्षांत ३६० दुर्मिळ सागरी प्राण्यांना मच्छीमारांनी दिले जीवनदान, कासव, व्हेलशार्क, डॉल्फिन, बुलियाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:29 PM2023-05-10T19:29:41+5:302023-05-10T19:30:18+5:30
भारत हा एक जैवविविधता संपन्न देश आहे. जगातील १७ जैवविविधता समृद्ध मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
मधुकर ठाकूर -
उरण : मागील पाच वर्षांत राज्यातील मच्छीमारांनी ३६० दुर्मिळ सागरी प्राण्यांना जीवनदान दिले आहे.या एकूण ३६० नोंदवल्या गेलेल्या प्रकरणात मच्छीमारांना एकूण रु. ५४,००,५५०/- (चौपन्न लाख पाचशे पन्नास) इतके नुकसान भरपाई अदा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मॅन्ग्रोज फाऊंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.मानस मांजरेकर यांनी दिली.
भारत हा एक जैवविविधता संपन्न देश आहे. जगातील १७ जैवविविधता समृद्ध मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतातील धोकाग्रस्त वन्यजीवांना व वनस्पतींना भारतीय वन्यजीव संरक्षण दिले गेले आहे, या वन्यजीवांमध्ये अनेक दुर्मिळ सागरी प्राण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रामध्ये सागरी प्राण्यांच्या अगदी सुक्ष्मजीवांपासून ते महाकाय देव माशापर्यंत अशा अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात.
यापैकी काही प्राण्यांच्या प्रजाती जसे समुद्री सस्तन प्राणी (डॉल्फिन, व्हेल), शार्क माशांच्या काही प्रजाती, सागरी कासवे यांना भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या परिशिष्ट १ अंतर्गत सर्वोच्च संरक्षण दिले गेले आहे. समुद्रात मासेमारी करीत असताना ब-याचवेळा संरक्षित सागरी प्रजाती चुकून मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. मच्छीमारांनी तातडीने जाळे कापले तरच हे प्राणी वाचू शकतात. बहुतांशत: मच्छीमार त्यांचे जाळे कापून अशा प्राण्यांना समुद्रात सोडतात. परंतू मासेमारीचे जाळे कापल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. मच्छीमारांच्या अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कांदळवन कक्ष, वन विभाग आणि राज्य मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तपणे मासेमारांकरिता नुकसान भरपाई योजना राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ पासून सुरु केली आहे.
मासेमारीचे काम करत असताना मच्छीमारांच्या जाळ्यात चुकून अडकलेल्या संरक्षित प्राण्यांना मासेमारी जाळे कापनू त्याची सुटका केल्यास त्यांना मासेमारी जाळ्याच्या नुकसानीच्या भरपाई करीता प्रजातीनुसार कांदळवन कक्ष,वन विभाग यांच्यावतीने १२०० ते २५,००० रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.
या २०२२-२०२३ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीसच राज्यभरातून एकूण ५३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. त्यातून ५२ मच्छीमारांना संरक्षित प्रजाती मासेमारी जाळ्यातून सुखरूप सोडण्यासाठी कांदळवन कक्षामार्फत एकूण रु. ६,५२,५००/- (सहा लाख बावन्न हजार पाचशे) एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली असल्याची माहिती मॅन्ग्रोज फाऊंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर डॉ.मानस मांजरेकर यांनी दिली.
२०१८ पासून राज्यातून दुर्मिळ सागरी प्राण्यांची एकूण ३६० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या ३६० प्रकरणात मच्छीमारांना एकूण ५४,००,५५०/- रुपये (चौपन्न लाख पाचशे पन्नास) नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे.यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक (३९) प्रकरणे कांदळवन कक्षाकडे प्राप्त झाली होती. त्यापाठोपाठ रत्नागिरी (६), रायगड (६) व मुंबई (१) या जिल्ह्यांचाही समावेश आहे. या प्रकरणांमध्ये २३ ऑलीव रिडले कासवे, २३ ग्रीन-सी कासवे, ५ हॉक्सबबल कासवे आणि १ लेदरबकॅ समुद्री कासव या दुर्मिळ प्रजातींना मच्छीमारांनी जीवनदान दिले आहे.
जीवनदान प्रजातीचे नाव संख्या भरपाईची रक्कम
१)ऑलीव रिडले कासव. १९७. २५४१७५०/-
२)ग्रीन-सी कासव. १०४. १५३२३००/-
३)हॉक्सबिल कासव. ०९. १३६८००/-
४)लेदरबॅक (समुद्री कासव). ०३. ७५०००/-
५)बहिरी मासा (व्हेल शार्क) ३९. ९०४७००/-
६) लांजा (जांइंट गिटार फिश) ०६. ८५०००/-
७) गादा (हंप बॅक डॉल्फिन). ०१. २५०००/-
७) बुलिया (फिनलेस पोर्पोईल). ०४. १०००००/-
एकूण - ३६० ५४,००,५५०/-