नवी मुंबईत भाजपने नेमले घरातलेच निवडणूक प्रभारी; दोन्ही मतदारसंघात आमदारांच्या नातेवाईकांना पसंती
By नारायण जाधव | Published: June 9, 2023 07:20 PM2023-06-09T19:20:30+5:302023-06-09T19:20:44+5:30
भारतीय जनता पक्षाने लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.
नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाने लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारी नेमले आहेत. नवी मुंबईतील विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर असे मतदारसंघ आहेत. यात ऐरोलीतून गणेश नाईक तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे या आमदार आहेत. एकाच पक्षाच्या या दोन्ही आमदारांतील मतभेद कमालीचे ताणलेले आहेत. अशातच दोन्ही मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांनी जे प्रभारी नेमले आहेत, ते आमदारांच्या घरातील सदस्यच असल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यानुसार ऐरोलीतून गणेश नाईक यांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक हे तर बेलापूर मतदारसंघातून मंदाताईंचे चिरंजीव माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही आमदारांत मतभेद असल्याने कदाचित वाद नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी घरातील व्यक्तींवरच जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी समन्वयाचे काम प्रभावीपणे करू शकतील, अशा नेत्यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. तेच उमेदवारदेखील असतील असे अजिबात नाही. प्रभारी व उमेदवार हे दोन वेगवेगळे विषय आहेत. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बावनकुळे यांनी राज्यभरातील प्रभारींची नियुक्ती करताना म्हटले आहे.
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. शहर गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असले तरी मंदाताईंनी दोनदा विजयश्री खेचून आणली आहे. शिवाय ओबीसींच्या आक्रमक महिला आमदार म्हणून त्या पक्षात लोकप्रिय आहेत. तर नवी मुंबईसारखे महत्त्वाचे शहर हातात ठेवायचे असेल, तर गणेश नाईक यांच्याशिवाय पर्याय नाही. हे पक्षश्रेष्ठी जाणून आहेत. यामुळे नाईक आणि म्हात्रे या घराण्याची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, असे गृहीत धरून आपले ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे धोरण ठाणे खाडीत बुडवून भाजपने सागर नाईक यांच्यावर ऐरोली तर नीलेश म्हात्रेंवर बेलापूरची जबाबदारी सोपविली आहे.
जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीकडे लक्ष
दोन्ही प्रभारी आपले काका-आईच्या कामांविषयी सकारात्मक अहवाल देणार हे नक्की असून तेच आगामी आमदार असतील, अशी चर्चा आहे; परंतु, आता पक्षाच्या वतीने जिल्हाअध्यक्षांच्या नियुक्त्याही लवकरच जाहीर होणार आहेत. त्यात कोणाच्या समर्थकाला श्रेष्ठी प्राधान्य देतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
संजीव नाईक कळवा-मुंब्राचे प्रभारी
ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. संजीव हे ठाण्याचे माजी खासदार असले तरी या मतदारसंघात गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाईक हे जुन्या बेलापूर मतदारसंघाचे आमदार असताना कळव्यातील आगरी आणि मुंब्य्रातील मुस्लीम मतदारांत ते लोकप्रिय आहेत. कारण जुन्या बेलापूर मतदारसंघात नवी मुंबईसह कळवा-मुंब्रा, ठाण्याचा बाळकूम-घोडबंदरपट्ट्यासह मीरा-भाईंदर शहराचा समावेश होता. आशिया खंडातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून त्याकाळी बेलापूरकडे पाहिले जात होते. भाजपची मुस्लीम मतदारांतील इमेज सावरण्यासाठी संजीव नाईक यांच्यावर कळवा-मुंब्रा मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात येत आहे.