मुंबई : गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले होते. विसर्जन तलावांवर निर्माल्य संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली केली होती. दहा दिवसामध्ये ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले असून त्यामधून तुर्भेमध्ये खतनिर्मीती केली जाणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीन ठिकाणी खतनिर्मीती करण्यात येणार आहे.
विसर्जनाच्यावेळी निर्माल्य तलावांमध्ये टाकून जलप्रदुषण केले जाऊ नये यासाठी महानगरपालिकेने काटेकोरपणे उपाययोजना केल्या होत्या. २२ नैसर्गिक तलाव व १३४ कृत्रीम तलावांवर ओले व सुके निर्माल्य संकलीत करण्यासाठी व्यवस्था केली होती. संपूर्ण शहरात निर्माल्य वाहतुकीसाठी ४० स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती. शहरात दिड दिवसाच्या विसर्जनाच्यादिवशी ६ टन, पाचव्या दिवशी ५.६९ टन, गौरी विसर्जनाच्या दिवशी १२.५७ टन, सातव्या दिवशी ४.५७ टन व दहाव्या दिवशी ९.८८ टन असे एकूण ३८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. यामध्ये फुले, दुर्वा, पुष्पमाळा, शमी, फळांच्या साली यांचा समावेश आहे. तुर्भे येथील मनपाच्या कचराभुमीवर त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मीती केली जाणार आहे.
कृत्रीम तलावांना नागरिकांचा चांगला प्रतिसादशहरातील उद्याने व इतर ठिकाणी या खताचा उपयोग केला जाणार आहे. याशिवाय अंकुर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिंचोली व करावे तलाव, नानासाहेब धर्माधीकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरखैरणे येथे निर्माल्यातून कचरा निर्मीती केली जात आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावांनाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. या तलावांमध्ये १५ हजार पेक्षा जास्त श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी संकलीत झालेली फळे व इतर प्रसादांंचे निराधार, गरजू नागरिकांना वितरण करण्यात आले आहेत.