फ्लेमिंगोंना ड्रोनपासून धोका आहे का? गृह विभाग करणार तपासणी
By नारायण जाधव | Published: June 13, 2024 03:26 PM2024-06-13T15:26:47+5:302024-06-13T15:28:12+5:30
अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
नारायण जाधव,नवी मुंबई :नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशात विसावलेल्या फ्लेमिंगोंचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत राज्याच्या गृह विभागाला या समस्येची तपासणी करण्यास सांगितले आहे.
याबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. नवी मुंबईतील एनआरआय आणि डीपीएस तलाव या फ्लेमिंगाेंच्या अधिवास क्षेत्रात काही अति उत्साही लोक हे गुलाबी पक्षी जवळून पाहण्यासाठी धोकादायकपणे ड्रोनचा वापर करतात. मात्र, ते नेव्हिगेट करताना ड्रोन या पक्ष्यांपासून अतिशय कमी उंचीवर उडविण्याची क्रेझ वाढली आहे. याबाबतची विस्मयकारक सुंदर चित्रे आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. परंतु, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत समाविष्ट असलेले फ्लेमिंगो हे अतिशय संवेदनशील पक्षी असून, त्यांना ड्रोनच्या ब्लेडमुळे दुखापत होऊ शकते किंवा ते मारले जाऊ शकतात, असे कुमार यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यांनी ई मेलद्वारे पाठविलेल्या या तक्रारीची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दखल घेऊन ई-मेलद्वारे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना समस्येकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे कुमार म्हणाले.
ड्रोनमधून येणारा आवाज या गुलाबी पक्ष्यांना हानिकारक असून, तो त्यांच्यासाठी धोकादायक आहे, असे पक्षी निरीक्षक ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी काही बदमाश लोक पक्ष्यांचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक करीत असल्याचा आरोप केला. यामुळे या पक्ष्यांचे येेथील पाणथळींवर येणे थांबले की त्या जागा लगेच विकासासाठी बिल्डरांच्या घशात घातल्या जातील. अशा लोकांना आवरायला हवे.