नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना

By नामदेव मोरे | Published: November 3, 2023 06:05 PM2023-11-03T18:05:08+5:302023-11-03T18:05:39+5:30

सीएसआर निधीतून उभारणार प्रकल्प, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधून प्रतिदिन ७५० टन कचरा संकलित होतो.

In Navi Mumbai, electricity will be generated from waste with gas; Municipal Corporation Scheme | नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना

नवी मुंबईत कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती होणार; महानगरपालिकेची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिला आहे. सद्य:स्थितीमध्ये कचऱ्यातून खत, आरडीएफ निर्मिती केली जात आहे. लवकरच कचऱ्यातून गॅससह वीजनिर्मिती करण्यात येणार असून, हा संपूर्ण प्रकल्प सीएसआर निधीमधून उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधून प्रतिदिन ७५० टन कचरा संकलित होतो. यामध्ये जवळपास ३५० मेट्रिक टन ओला व ४०० टन सुक्या कचऱ्याचा समावेश आहे. तुर्भेमधील डंपिंग ग्राउंडवर या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. केंद्र शासनाने देशातील तेल कंपन्यांना सीएसआर निधीमधून कचऱ्यापासून गॅस व विद्युतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. सद्य:स्थितीमध्ये देशातील काही मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. बीपीसीएल, इंडियन ऑइल, ओएनजीसी, गेल अशा कंपन्यांच्या सीएसआर निधीचा या प्रकल्पांसाठी वापर केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्येही कचऱ्यातून गॅस व विद्युत निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

 नवी मुंबईमध्ये गॅस व विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी ओएनजीसीने दाखविली आहे. त्यांच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रकल्पाची क्षमता त्यापासून किती गॅस व विद्युत निर्मिती होईल याविषयीचे आराखडे तयार केले जात आहे. प्रकल्पाचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या प्रकल्पामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. शहर अभियंता संजय देसाई व अभियांत्रिकी विभागही या प्रकल्पाच्या नियोजनामध्ये विशेष लक्ष देत आहेत.

पर्यावरणपूरक प्रकल्प
कचऱ्यातून ओएनजीसीच्या सहकार्यातून गॅस व विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी महानगरपालिकेला काहीही खर्च करावा लागणार नाही. पर्यावरणाचे रक्षण होणार असून, मनपाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

कोपरखैरणेत निसर्ग उद्यान

मनपाने कोपरखैरणे सेक्टर १४ मधील डपिंग ग्राउंडच्या जागेवर निसर्गउद्यानाची निर्मिती केली आहे. परिसरात ६५ हजार वृक्षलावगड केली आहे. या परिसरामध्ये ७ ते ८ हजार नागरिक रोज सकाळी व सायंकाळी चालण्याच्या व्यायाम करण्यासाठी येत आहेत.


खतासह आरडीएफ निर्मिती
महानगरपालिकेचा तुर्भेमधील ३६ एकर भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती केली जात आहे. याशिवाय औद्योगिक इंधन अर्थात आरडीएफची निर्मिती केली जात आहे. कचऱ्यावर जास्तीत जास्त प्रक्रिया करण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे.

Web Title: In Navi Mumbai, electricity will be generated from waste with gas; Municipal Corporation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज