बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांची होणार चौकशी; नगरविकास सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश
By नारायण जाधव | Published: July 4, 2024 04:32 PM2024-07-04T16:32:29+5:302024-07-04T16:33:42+5:30
‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण जाेडून नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेल करून चौकशीची मागणी केली होती.
नारायण जाधव, नवी मुंबई : नवी मुंबईतील भूस्खलनप्रवण बेलापूर टेकडीवर सुमारे २ लाख ३० हजार स्क्वेअर फूट अर्थात वन-बीएचकेचे सुमारे ६०० फ्लॅट्स एवढे अतिक्रमण करून ३० धार्मिक आणि सामाजिक वास्तूंनी जमीन बळकावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश नगरविकास सचिवांना दिले आहेत.
‘लोकमत’मधील वृत्ताचे कात्रण जाेडून नॅट कनेक्टचे बी. एन. कुमार यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना ई-मेल करून चौकशीची मागणी केली होती. तिला तत्काळ प्रतिसाद देऊन मुख्यमंत्र्यांनी याबाबत नगरविकास सचिवांना चौकशी करण्यास सांगितले आहे. शहरवासीयांनी शिंदे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंदिरे आणि सामाजिक वास्तूंनी बळकावलेले भूखंड कोट्यवधी रुपये किमतीचे आहेत. नगरविकास सचिवांनी याबाबत पाहणी करून ही अतिक्रमणे तोडण्याचे निर्देश दिले तर सिडकोला कोट्यवधी रुपयांचा लाभ होणार आहे.
असे आहे अतिक्रमण-
बेलापूर टेकडी भूस्खलनप्रवण असून, येथे सर्वांत मोठे मंदिर श्री श्रीयादेवीचे आहे. जे चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत व्यापलेले आहे. त्यानंतर संत श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज समाधी स्मारक मंदिर आणि श्री देवनारायण मंदिर दोन हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत आहे. नॅट कनेक्ट फाउंडेशनने सिडकोकडूनच आरटीआय अंतर्गत माहिती मिळवून हे अतिक्रमण उघडकीस आणले आहे. मंदिरांनी व्यापलेले एकूण क्षेत्रफळ २१ हजार ४११.३६ चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, जे २ लाख ३० हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. शहराच्या रिअल इस्टेटच्या दृष्टीने सुमारे ६०० वन-बेडरूम-हॉल-किचनचे फ्लॅट त्यावर बांधता येऊ शकतात. शिवाय अनेक झाडे अंदाधुंदपणे कापल्याने माती सैल झाली असून, भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.