पनवेल मनपाच्या ताफ्यात चार वुड श्रेडींग मशीन; झाड्यांच्या फाद्यांची छाटणी करून खतनिर्मिती
By वैभव गायकर | Published: July 5, 2024 05:08 PM2024-07-05T17:08:23+5:302024-07-05T17:10:47+5:30
मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते.
वैभव गायकर,पनवेल: मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्या अथवा तुटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावणे जिकरीचे असते. त्यांना आग लावल्यास एक प्रकारे प्रदूषण होत असते.अशा फांद्यांचे तंत्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पालिकेने वुड श्रेडींग मशीन खरेदी केल्या आहेत.या मशीनच्या आधारे फांद्यांचे बारीक तुकडे करून त्यापासुन खत निर्मिती केली जाणार आहे.
सध्याच्या घडीला प्राथमिक स्वरूपात चार या वुड श्रेडींग मशीन खारघर सेक्टर १२ प्लॉट नंबर १,कळंबोली सेक्टर ६ ई प्लॉट नंबर २,कामोठे सेक्टर २०,आणि नवीन पनवेल सेक्टर६ प्लॉट नंबर ९ आदी ठिकाणी या मशीन बसविण्यात आल्या आहेत.झाडांच्या फांद्या कुजण्याची वेळ लागत असल्यामुळे त्या श्रेडींग मशीनद्वारे बारीक केल्यास त्याचे कंपोस्टिंग लवकर होते. त्यामुळे सदर कचऱ्याची लवकर विल्हेवाट लावण्यासाठी मदत होते. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर ४ वूड श्रेडिंग मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.पालिका क्षेत्रातील उद्यानात या खताचा वापर केला जाणार आहे. १२५ मिमी आकाराचे सर्व प्रकारच्या झाडाचे या मशीनद्वारे कटिंग केले जाते. २५०० ते ३०० किलोग्राम वजनाची या मशीनची कॅपसिटी आहे.पालिकेच्या उद्यानासह इतर पर्यावरण प्रेमी संस्थांना याठिकाणी तयार होणारा खत पालिकेमार्फत पुरवता येणार आहे.प्रायोगिक तत्वावर राबविलेला हा उपक्रम आहे.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध प्रयोग राबविले जात आहेत त्याचाच हा भाग असल्याचे उपायुक्त डॉ वैभव विधाते यांनी सांगितले.
भविष्यात पालिका क्षेत्रात इतर ठिकाणी देखील अशाप्रकारे वुड श्रेडींग मशीन बविण्याचा पालिकेचा निर्धार आहे.हि मशीन इलेक्ट्रिक पावरवर चालणारी यंत्रणा आहे.
प्रतिक्रिया -
अनेक वेळा झाडांच्या तुटलेल्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या असतात त्यांचा वाहतुकीस तसेच रहदारीस देखील अडथळा होतो.वुड श्रेडींग मशीन द्वारे या झाडांच्या फांद्यांचे व्यवस्थित तुकडे केले जाणार आहेत.त्यानंतर त्याच्यातून कंपोष्ट खत निर्मिती केली जाणार आहे.विशेष म्हणजे झाडांच्या फांद्याना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.पालिका प्रशासन अशाप्रकारे नवीनपूर्ण उपक्रम राबवत राहील.- डॉ वैभव विधाते ( उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )