'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

By नामदेव मोरे | Published: July 11, 2024 05:31 PM2024-07-11T17:31:07+5:302024-07-11T17:32:07+5:30

नवी मुंबईत जनसंवाद अभियान राबविणार.

in navi mumbai get ready for municipal elections with vidhan sabha election mla ganesh naik appeal to activist | 'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

'विधानसभेसह मनपा निवडणुकीसाठी सज्ज व्हा'; गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

नामदेव मोरे, नवी मुंबई : कार्यकर्त्यांनी विधानसभेसह महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक वार्डामध्ये आपले कार्यालय असले पाहिजे. कार्यालयामध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. मी स्वत: संपूर्ण नवी मुंबईत जनसंवाद अभियान राबवून नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविणार असल्याचे मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केले आहे.

बेलापुरमध्ये भाजपा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येथील कार्यालय भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व नवी मुंबईतील जनतेचे आहे. येथे सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. फक्त बेलापुरच नाही तर प्रत्येक तालुका स्तरावर कार्यालय असले पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये कार्यालय असले पाहिजे. या कार्यालयांमध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेल्या त्रुटी सुधारण्यावर भर द्या. विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज रहावे. भारतीय जनता पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे. कोरोनापासून आतापर्यंत ७९ वेळा महानगरपालिका आयुक्तांच्या भेटी घेवून जनतेचे प्रश्न सोडविले. आता संपूर्ण शहरभर जनसंवाद कार्यक्रम राबविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

 भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनीही सीबीडीमध्ये महानगरपालिका, सिडको, कोकणभवन, पोलीस आयुक्तालय ही कार्यालये असून हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे कार्यालय सुरू केले आहे. गणेश नाईक यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ३६५ दिवस या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडविले जातील. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी व संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी हे कार्यालय उपलब्ध असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जे. डी. सुतार, अनंत सुतार, नेत्रा शिर्के, रविंद्र इथापे व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये आमचं ठरलंय अशी चर्चा-

कार्यालय उद्धाटन प्रसंगी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आमचं ठरलय आता आमच्या हक्काचा आमदार हवा अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. बेलापूर मतदार संघात संदीप नाईक तयारी करत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. याविषयी गणेश नाईक यांना विचारले असता मी ऐरोलीचे प्रतिनिधीत्व करत आहे. पक्षाने ठरवले तर तेथून लढेल. पक्षाने दुसऱ्या कोणाला संधी दिली तरी स्वागत असेल. बेलापूरमध्येही कोणी उभे रहायचे हे पक्ष ठरवेल असे सांगून या मुद्याला व चर्चेला बगल दिली. संदीप नाईक यांनीही याविषयी भाष्य टाळले व आमचं ठरलय शहराचा विकास एवढीच प्रतिक्रिया दिली.

Web Title: in navi mumbai get ready for municipal elections with vidhan sabha election mla ganesh naik appeal to activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.