हापूसची विक्री डझनमध्ये; भाव किलोच्या दरात, नागरिकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 04:24 PM2024-03-23T16:24:28+5:302024-03-23T16:26:27+5:30
बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.
बाजार समितीत शुक्रवारी ५०,४९९ पेट्यांची आवक झाली. यामध्ये ३९,१६५ पेट्या हापूसचा समावेश आहे. उर्वरित आवक इतर राज्यांमधून झाली आहे. हापूस आंब्याची विक्री डझनच्या प्रमाणात केली जाते; परंतु बाजार समिती प्रशासन त्यांच्या अभिलेखावर प्रतिकिलोप्रमाणे बाजारभावाची नोंद करीत आहे.
बाजारभाव अद्ययावत करावेत -
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती रोज शासनाला आवक व बाजारभावाची माहिती देते; परंतु काळीवेळा अनेक महिन्यांपासून बाजारभावात काहीच फरक दिसत नाही. अनेक महिने दर स्थिर कसे राहतात, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला असून बाजारभाव रोज अद्ययावत व वस्तुस्थितीप्रमाणे द्यावेत, अशीही मागणी केली जात आहे.
शेतकरीही संभ्रमात -
शासनाला पाठविण्यात येणाऱ्या दरतक्त्यामध्येही किलोप्रमाणे भाव दिले जात आहेत. विक्री डझनप्रमाणे व भाव किलोच्या दरात या फरकामुळे ग्राहकांचा व शेतकऱ्यांचाही गोंधळ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये हापूसला नक्की किती भाव मिळतो, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. खरेदीदारांचीही दिशाभूल होत आहे.
१) बाजार समिती प्रशासनाने हापूसचे दर डझनप्रमाणे प्रसारित करावेत व इतर आंब्यांचे दर किलोप्रमाणे प्रसारित करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
२) नेरूळमधील सामाजिक कार्यकर्ते सचिव पवार यांनीही याविषयी बाजार समिती प्रशासनाकडे मागणी केली आहे.